आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट: युद्धस्थितीचा चौथ्यांदा अनुभव; गावामध्येच राहण्याचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिरोजपूर सीमा - पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइकनंतर गुरुवारी सरकारने पंजाब सीमेला लागून असलेली ९८७ गावे रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. दहशतीमुळे येथील जवळपास सर्व जणांनी पलायन केले आहे. मात्र, फिरोजपूर सेक्टरच्या ममदोट सीमेच्या गट्टी राजोके आणि गट्टी मस्ताचे वातावरण एकदम निराळे दिसले.
या गावाच्या एका बाजूला सतलज दरी आहे, तर दुसऱ्या बाजूस जंगल. यानंतर पाकिस्तान केवळ दीड किमी अंतरावर आहे. मात्र, लोकांमध्ये प्रचंड धैर्य असल्याचे जाणवले. इथे शुक्रवारची सकाळ नेहमीप्रमाणे सुरू झाली. तारकुंपणाच्या सीमेजवळील या गावातील अाबालवृद्ध, तरुणांच्या चेहऱ्यावर भीतीची पुसटशीही रेषा नव्हती. ज्येष्ठ नागरिक पत्ते खेळत असताना दिसले. महिला शेतात काम करत असताना दिसल्या. सरकारी शाळा बंद होत्या. धाडसी ग्रामस्थांनी सांगितले की, हे सर्व आम्ही चौथ्यांदा पाहतो आहोत. काही दिवसांनंतर सर्वकाही ठीक होईल. ‘भास्कर’ चमूने या गावाचा दौरा करून पाहणी केली तेव्हा येथे पंजाबच्या अन्य गावांपेक्षा वेगळे चित्र दिसून आले.
पीक सोडून कुठे जाणार : सरपंच सुरजित सिंह म्हणाले, गावची लोकसंख्या ११०० आहे.१९९९ मध्ये कारगिल झाले तेव्हा भूसुरुंग पेरल्यामुळे शेती ठप्प झाली. त्यामुळे जावे लागले. मात्र, धानाचे पीक सोडून कसे जाणार?

गट्टी मस्ता गाव
तारकुंपणाच्या पलीकडे पाक सीमा आहे. या गावात महिला शेतीकाम करताना दिसल्या. मुले गल्लीत खेळताना दिसत होती. ५८० लोकसंख्येच्या या गावात ७५ कुटुंबांना पलायन करायचे होते. मात्र, सर्वजण निर्भीडपणे पाय रोवून आहेत. जंगीर सिंह म्हणाले, त्यांची जमीन तारकुंपणापलीकडे आहे. दररोज दुसऱ्या बाजूस शेती केली जाते. शुक्रवारी बीएसएफने गेट न उघडल्यामुळे १३ कुटुंबांना पीक कापणीसाठी जाता आले नाही.
तीन वेळा गाव उद््ध्वस्त
गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता स्वयंपाकाची तयारी सुरू होती. त्यादरम्यान सीमा सुरक्षा दलाने सीमा क्षेत्रातील १० किमी परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. मात्र, त्याचा परिणाम जाणवला नाही. शुक्रवारी सकाळी प्रीतम सिंह(७० ) यांना चमूने विचारणा केली की, तुम्ही इथे पत्ते खेळत आहात. त्यावर ते म्हणाले, हे पहिल्यांदा होत नाही. मिल्खा सिंह(५०) म्हणाले, गाव तीनदा उजाड पाहिले. नंतर सर्वकाही ठिक.
गाव गट्टी राजोके : कुटुंब सुरक्षित स्थळी पोहोचले, ज्येष्ठ घर सांभाळतात
फिरोजपूर सीमेवरील ३०४ गावांतील जवळपास दोन लाख लोकांनी पलायन केले आहे. काही नातेवाइकांकडे थांबले आहेत, तर काही सरकारी छावणीत आहेत. इथे ३५ छावण्या तयार केल्या आहेत. फिरोजपूरच्या हुसेनीवाला सीमेलगत २५०० लाेकसंख्येच्या गट्टी राजोकेमध्ये ८० टक्के लोकांनी पलायन केले आहे. युद्धावेळी सर्वाधिक फटका याच गावाला बसतो. ११.०० वाजता घराबाहेर बसलेले गुरदयाल सिंह(६५) यांनी सांगितले की, मी चौथीत शिकत होतो तेव्हा १९६५ च्या युद्धात घर सोडावे लागले होते. १९७१ मध्ये दहावीत हाेतो, तेव्हा चार महिने घरापासून लांब राहिलो. कारगिलच्या वेळी शेती नष्ट झाली. आता गाव रिकामे करण्याची वेळ आली तेव्हा सात सदस्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवले. मी आणि पत्नी घर सांभाळण्यासाठी थांबलो आहोत. मिल्खा सिंह(७०) आणि जनक कौरही(५५) घर सांभाळण्यासाठी थांबले आहेत.
बातम्या आणखी आहेत...