आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपची तिसरी यादी जाहीर; तीन मंत्र्यांना नाकारले तिकीट; 13 विद्यमान आमदारांनाही स्थान नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी २८ उमेदवारांची तिसरी यादी सोमवारी जाहीर केली. तीन विद्यमान मंत्री आणि १३ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. माजी अर्थमंत्री सौरभ पटेल यांना बोटाद आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आर. सी. फालदू यांना जामनगर-दक्षिण मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.  


ज्या मंत्र्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे त्यात जयंती कावडिया (ध्रंगध्रा), वल्लभ वाघसिया (सावरकुंडला) आणि नानू वनानी (कटारगाम) यांचा समावेश आहे. आपण निवडणूक लढवू इच्छित नाही, त्याऐवजी पक्ष मजबूत करण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे, असे कावडिया यांनी अलीकडेच जाहीर केले होते. या यादीत मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या सरकारमधील संसदीय सचिव जेठा सोळंकी (कोडिनार) यांचेही नाव नाही. सोळंकी यांनी दोन दिवसांआधीच आमदार पदाचा आणि पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. गुजरातमधील भाजप सरकारच्या कार्यकाळात दलितांवर अत्याचार होत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. जामनगर-दक्षिणच्या आमदार आणि आनंदीबेन पटेल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात २०१४ ते २०१६ दरम्यान महिला आणि बालविकासमंत्री असलेल्या वसुबेन त्रिवेदी यांनाही या वेळी भाजपने तिकीट नाकारले आहे.  


माजी प्रदेशाध्यक्ष आर. सी. फालदू यांना जामनगर-दक्षिणमधून तिकीट देण्यात आले आहे. गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचा दलित चेहरा असलेले रमणभाई व्होरा यांचा मतदारसंघ बदलण्यात आला आहे. त्यांना इदारऐवजी दासदा मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. दासदातील विद्यमान आमदार पूनमभाई मकवाना यांना तिकीट नाकारण्यात आले आहे.  
भाजपने गेल्या आठवड्यात १०६ जागांवरील उमेदवार जाहीर केले होते. सोमवारी त्यात २८ जागांची भर पडली असून एकूण १८२ जागांपैकी १३४ उमेदवार पक्षाने आतापर्यंत जाहीर केले आहेत. गुजरातमध्ये ९ डिसेंबर आणि १४ डिसेंबर अशी दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. मतमोजणी १८ डिसेंबरला होईल.  

 

राष्ट्रवादी सर्व जागा लढणार; काँग्रेससोबतची चर्चा फिसकटली  

काँग्रेस पक्षासोबतची जागावाटपाबाबतची चर्चा फिसकटल्यामुळे गुजरातमधील सर्व १८२ जागांवर निवडणूक लढवण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी केली. २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली होती. सध्याच्या विधानसभेत राष्ट्रवादीचे २ आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की,‘आम्ही स्वबळावर सर्व १८२ जागा लढवणार आहोत. आमची यादी लवकरच जाहीर होईल.’ काँग्रेसने रविवारी ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. तीत राष्ट्रवादीचे कुटियाना मतदारसंघातील विद्यमान आमदार कंधाल जडेजा यांच्या मतदारसंघातील उमेदवाराचाही समावेश होता. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी अशोक गहलोत म्हणाले की, ‘गुजरातमधील परिस्थितीनुसार राष्ट्रवादीने जागांची मागणी करायला हवी होती. त्यांनी मर्यादित जागा मागितल्या असत्या तर युती शक्य होती.’

बातम्या आणखी आहेत...