आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या कारखान्यातून नितीश यांचा प्रचार, फॅशनेबल वस्तूंचा समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा ; राजकारणात व्यापार शक्य आहे, पण व्यापारात राजकारण केले जात नाही. म्हणूनच बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रचार साहित्य नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचे कट्टर विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून येत आहे. महाआघाडीतील राजद, जदयू आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष गुजरातमधून प्रचार साहित्य मागवत आहेत.
सर्वच पक्षांच्या प्रचार साहित्याची निर्मिती गुजरातमधील एकाच कारखान्यात होत आहे. म्हणजेच जिथे रालोआच्या झेंड्यांची निर्मिती होते तिथेच महाआघाडीचीदेखील. या प्रचार साहित्यात घरगुती साहित्यापासून फॅशनेबल वस्तूंचा समावेश आहे. पाटणा येथे या साहित्यांची दुकाने सुरू झाली आहेत. उमेदवारी जाहीर होताच या दुकानांमध्ये वर्दळ वाढली आहे. गतनिवडणुकीपेक्षा यंदा ५० ते ७० टक्के विक्री घटली आहे, अशी माहिती येथील दुकानदारांनी दिली. मात्र, सर्वच पक्षांची उमेदवारी जाहीर झाल्यावर विक्री वाढेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

प्रचार साहित्यांत युती नाही
निवडणुकीच्या रणांगणात पक्षांमध्ये युती झाली आहे. मात्र, प्रचार साहित्यांमध्ये त्याची झलक दिसत नाही. सोनिया, राहुल, लालू आणि नितीश यांचे सोबतची छायाचित्रे दिसत नाहीत. ज्या पक्षाचे उमेदवार आहेत, ते स्वपक्षीय नेत्यांची छायाचित्रे असलेले साहित्य वापरतात. सहकारी पक्षांच्या नेत्यांची छायाचित्रे कमी वापरतात. हीच परिस्थिती रालोआची आहे.

येथून येते निवडणूक प्रचाराचे साहित्य
सुरत आणि अहमदाबाद येथून
इतर : दिल्ली, गुजरात, यूपी, आंध्र प्रदेश
यांचे छायाचित्र सर्वाधिक
नरेंद्र मोदी, लालू यादव, नितीश कुमार, सोनिया गांधी, राहुल गांधी, रामविलास पासवान, उपेंद्र कुशवाहा आणि अरुण कुमार, जीतनराम मांझी,
सर्वाधिक साहित्य
भाजप, जदयू, राजद, हम, काँग्रेस, रालोआ

प्रचार साहित्यांची ५० कोटींची उलाढाल
प्रचार साहित्यांची ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होते. मागील निवडणुकीत उमेदवारी घोषित होताच मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स आल्या होत्या, अशी माहिती येथील व्यापारी सत्येंद्र सिंह आणि बबलू शर्मा यांनी दिली. यंदा मात्र तशी परिस्थिती नाही. भाजपचे प्रचार साहित्य थेट दिल्लीतील भाजप मुख्यालयातून पोहोचत आहे, असे काही व्यावसायिकांनी सांगितले. इतर पक्षांचे उमेदवार त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार खरेदी करत आहेत. साधारणपणे एक उमेदवार ५ ते ७ लाखांपर्यंत प्रचार साहित्यावर खर्च करतो. अधिकांश नेत्यांचा मोठा खर्च झेंडे आणि बिल्ल्यांवर होतो.