दीनानगर (गुरुदासपूर) - पंजाबातील दहशतवाद १९९५ मध्ये संपुष्टात आला होता. आता २० वर्षांनंतर त्याने पुन्हा डोके वर काढले. परंतु जवानांनी १२ तासांतच त्याचा नायनाट केला. मुंबईवरील २६/११च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतरचा सर्वाधिक वेळ चकमक चाललेला हा दुसरा घातपात होता. सीमेजवळ १० कि.मी. दूर गुरुदासपूरच्या दीनानगरमध्ये हा हल्ला झाला. पाकिस्तानातून आलेल्या तीन अतिरेक्यांनी ७ जणांचे प्राण घेतले. शहिदांमध्ये एसपी (डिटेक्टिव्ह) बलजितसिंह यांच्यासह ४ पोलिसांचाही समावेश आहे. तीन लोकही मृत्युमुखी पडले.
सायंकाळी उशिरा कमांडोंनी तिन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घातले. अतिरेक्यांकडे चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे व जीपीएस सिस्टिम आढळली. अतिरेक्यांना मारण्यात एवढा वेळ का लागला, यावर त्यांना जिवंत पकडण्याचा इरादा होता, असे पंजाबच्या डीजीपींनी सांगितले. हे तिन्ही अतिरेकी पाकिस्तानातून आले होते, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दिवसभर गप्प राहिलेल्या पाकने सायंकाळी निषेधाचे अश्रू ढाळले.
पहाटे 5.10
लष्करी वेशात अतिरेकी जीटी रोडवर. मारुती कारने जाणा-या कमलजितला गोळी घातली आणि त्यांना बाहेर फेकून शहरात घुसले.
पहाटे 5.12
सुमारे अर्धा कि.मी. पुढे येऊन ढाबाचालक अमरजितला गोळी घालून मारले. मग हे अतिरेकी बसस्थानकाच्या दिशेने निघाले.
पहाटे 5.25
ठाण्यामागील होमगार्ड बराकीवर कब्जा करून अतिरेक्यांचा गोळीबार. गुरुदासपूर मुख्यालयातून
६ वाजता पोलिस, तर 8.10 वाजता पठाणकोट छावणीतून लष्करी तुकडी आली.
11.45 ते 2.30 तुफान गोळीबार. एसपी (डिटेक्टिव्ह) बलजितसिंह यांचा डोक्यात गोळी घुसून मृत्यू. एक वाजता हेलिकॉप्टरने एनएसजी कमांडो दीनानगरला आले. सर्वांनी अंतिम रणनीती आखली.
दहशतवादावर विजय मिळवून देणारे ३ हीरो
शहीद एसपींचे अखेरचे शब्द : खात्मा करूनच श्वास घेईन
चकमकीत सहभागी एएसआय भूपेंद्रसिंह म्हणाले, ‘एसपी बलजितसिंह यांनी छतावर टाकीच्या मागे मोर्चा सांभाळला होता. सावध राहा, असे मी त्यांना सांगितले. ते म्हणाले- माझी चिंता करू नका. त्यांचा खात्मा केल्यानंतरच मी श्वास घेईन. त्याच वेळी त्यांच्या डोक्यात गोळी लागली.’बलजितसिंहांचे पिता अच्छरसिंह पोलिस निरीक्षक होते. अतिरेक्यांनी १९८४ मध्ये त्यांची हत्या केली होती.
बसचालकाने वाचवले प्राण
गोळीबार केलेली बस नानकचंद चालवत होते. त्यांनी बस थेट रुग्णालयात नेल्याने ६ जखमींवर उपचार झाले. बसमध्ये ७५ प्रवासी होते.
ट्रॅकमॅन अश्विनी नसते तर रेल्वे उडाली असती
अश्विनीकुमार यांनाच दीनानगर रेल्वे मार्गावर बॉम्ब दिसला. त्यांनी २०० मीटरवर रेल्वे थांबवून कंट्रोल रूमला कळवले.
पहाटे 5.13
बस स्टँडकडे जाणा-या रोडवेज बसवर गोळीबार. चार जखमी. चालक बस घेऊन पळाला. पुढे अलाहाबाद बँक एटीएमजवळ विद्यार्थ्यांवर गोळीबार.
पहाटे 5.15
दीनानगर ठाण्यात गोळीबार. लगतच्या रुग्णालयाच्या खिडकीच्या दिशेने गोळीबार.
दोन रुग्णांचा मृत्यू.
दुपारी 2.30 लष्कर व एनएसजीही कारवाईत सहभागी.
4.45 वाजता मोहीम संपली.
येण्याचे 2 मार्ग...
>जम्मूत एलओसीमार्गे : पावसात कुंपण तुटल्याने घुसखोरी झाली.
>पंजाबात रावी नदी : या सीमेवर कुंपण आहे. परंतु नदी व नाल्यांच्या चोरट्या रस्त्याने अतिरेकी येत आहेत.
गुरुदासपूरच का?: एका वर्षात जम्मूच्या हिरानगर, कठुआ व सांबात असेच चार हल्ले झालेे. गुरुदासपूर त्याला लागूनच आहे. जवळ आंतरराष्ट्रीय सीमा आहे. या भागात काश्मीरच्या तुलनेत कमी सुरक्षा दले हाच सॉफ्ट पॉँइट ठरला.
खलिस्तान रिटर्न: पंजाबमध्ये दहशतवादाच्या वेळी गुरुदासपूर, विशेषत: दीनानगर खलिस्तानी अतिरेक्यांचा तळ होता. दहा दिवसांपूर्वीच खलिस्तानी नेता गोपाल चावलाने हिजबुलचा अतिरेकी हाफिज सईदची भेट घेतली. पंजाबात खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रिय करण्याचा कट असावा.