गुडगाव - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईला मागे टाकत गुडगाव शहराने देशातील सर्वात श्रीमंत होण्याचा मान पटकावला आहे. देशातील 16 मोठ्या शहरांत गुडगावचा समावेश झाला आहे. समृद्धी आणि श्रीमंतीच्या बाबतीत अन्य शहरांना गुडगावने मागे टाकले आहे. जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने केलेल्या सर्वेक्षणात गुडगावने मुंबई, बंगळुरू, चेन्नई या शहरांवर मात करत पहिला क्रमांक पटकावला. यादीत चेन्नई दुस-या क्रमांकावर आहे.
गुडगावमधील 27 टक्के घरांत उपकरणे : गुडगाव येथे 27% घरांत सर्व प्रकारच्या सुविधा, उपकरणे आहेत. चेन्नईत 24 % घरांत आधुनिक गॅजेट्स उपलब्ध आहेत. बंगळुरू (23.6 %) तिस-या स्थानी असून 15.7 टक्के गॅजेट्ससह मुंबई चौथ्या स्थानी आहे.
60 % लोकांकडे मोबाइल : गुडगावमधील नागरिकांची सर्वात लोकप्रिय वस्तू टीव्ही आहे. येथे 77 टक्के घरांमध्ये कमीत कमी एक टीव्ही आहे. एक तृतीयांश घरांत कॉम्प्युटर व लॅपटॉप आहे. 41 टक्के घरांमध्ये दुचाकी, तर 30 टक्के घरांत कार आहेत. मोबाइल फोन बाळगणा-यांमध्ये गुडगाव अव्वल असून येथे 60 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांकडे मोबाइल फोन आहेत.