आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत परदेशात? रोहतकमध्ये झाली एक तास गुप्त बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक- हरियाणा पोलिस राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतचा कसून शोध घेत आहेत. तिला तुरुंग प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत २५ ऑगस्ट रोजी फतेहाबादला पाठवले होते. पंचकुला येथे राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर हनीप्रीत  हेलिकॉप्टरमधून बाबासोबत सुनारिया तुरुंगात गेली होती. तेथे साडेचार तास थांबल्यानंतर तिला घेऊन जाण्यासाठी चार लोक एका कारमधून आले होते. फतेहाबाद पोलिस ठाण्यात हवालदार विकाससोबत जात असल्याचे तिने तुरुंगाधिकाऱ्यांना लेखी दिले होते. त्या वेळी तिच्यासोबत झज्जर येथील जितेंद्रकुमार आणि रोहतकचा संजय कारमध्ये होते. परंतु तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काही तासांतच ती गायब झाली. 
 
फतेहाबादचे पोलिस अधीक्षक कुलदीपसिंग यांनी मात्र विकास नावाचा कोणी हवालदार येथे कामावर नाही, असे सांगितले. हनीप्रीत परदेशात पळून गेली असल्याची शंका पोलिसांनी बोलून दाखवली. यामुळे लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. हनीप्रीतचे शेवटचे लोकेशन जिंद बायपास येथे आढळले आहे. त्यानंतर ती गायब झाली आहे.   

राम रहीमची अनेक रहस्ये हनीप्रीतकडे
हनीप्रीतला राम रहीमची अनेक रहस्ये माहिती अाहेत. बाबाच्या चित्रपटात तिचा थेट हस्तक्षेप असायचा. तिचा हुकूम कोणी टाळत नसे. तिचे कुटुंब डेरात राहून अनेक कंपन्यांचे व्यवहार पाहतात.

१२ सेकंदांच्या व्हिडिओने खळबळ  
हनीप्रीतचा रोहतक येथील अनुयायांसोबतचा व्हिडिओ व छायाचित्र हाती लागले आहे. १२ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये हनीप्रीत कारमधून रोहतकहून निघालेली दिसत आहे. हा व्हिडिओ व छायाचित्र रोहतक येथील पीटीसी येथील मेसच्या बाहेरचे आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...