नवी दिल्ली/ ग्वाल्हेर - मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठातील न्यायाधीशांवर लैंगिक शोषणाचा आरोप करत एका अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश असलेल्या महिलेने राजीनामा दिल्याने न्यायव्यवस्थेत खळबळ उडाली आहे. भारताचे सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनीही या आरोपांची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी योग्य न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. सरन्यायाधीश लोढा यांनी सांगितले, ‘या प्रकरणात सर्वच पैलूंवर विचार करून ते हाताळावे लागेल. हे सर्व प्रकरण सविस्तरपणे माझ्यासमोर आलेले नाही. जेव्हा ते समोर येईल तेव्हा दुर्लक्ष करून चालणार नाही.’
महिलेचे आरोप काय? सरन्यायाधीशांना लिहिलेल्या नऊ पानी पत्रात न्यायाधीश महिलेने म्हटले आहे की, ‘हायकोर्टातील न्यायाधीश गेल्या काही महिन्यांपासून माझ्या कामात ढवळाढवळ करत आहेत. एवढेच नव्हे, त्यांनी हळूहळू मला उद्देशून रंगेल शेरेबाजी सुरू केली.’ एकदा तर एका विवाह समारंभात या न्यायाधीशाने त्याच्या 16 वर्षीय मुलीसमोर अशी शेरेबाजी केली. महिलेच्या तक्रारीनुसार हायकोर्टाचे हे न्यायाधीश महोदय तेव्हा म्हणाले, ‘तुझ्या कामापेक्षा तू किती तरी अधिक सुंदर आहेस...’
... म्हणे नृत्य करताना पाहायचे आहे! : न्यायाधीश महिला तक्रारीत पुढे म्हणते, गेल्या डिसेंबरमध्ये या न्यायालयातील एका अधिकार्याच्या पत्नीने मला फोन केला. त्याला त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी म्हणे मी नृत्य करताना पाहावयाचे होते.
... तर मृत्युदंड द्या
हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी महिलेने केलेले हे आरोप फेटाळले आहेत. सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी या प्रकरणी सीबीआय किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेमार्फत चौकशीस सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे नमूद केले आहे. यातील एखादाही आरोप सिद्ध झाला तर मृत्युदंडाला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.