आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Handawada Firing : Tension In Kashmir, Curfew In Valley

हंडवाडा चकमक: काश्मीरमध्ये तणाव; खोऱ्यात संचारबंदीसदृश निर्बंध जारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर / नवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यात निदर्शक आणि लष्कराचे जवान यांच्यात नव्याने उडालेल्या चकमकीत आणखी एका युवकाचा मृत्यू झाल्याने काश्मीरमध्ये तणाव आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीसदृश निर्बंध लादण्यात आले आहेत. हंडवाडा येथे मंगळवारी निदर्शक आणि लष्कराचे जवान यांच्यात चकमक उडाली होती. लष्कराच्या गोळीबारात दोन युवक आणि एक महिला असे तीन जण ठार झाले होते, तर चार जण जखमी झाले होते. त्या वेळी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही, असा ठपका ठेवून एका सहायक पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारच्या गोळीबाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी निदर्शक बुधवारी पुन्हा रस्त्यावर उतरले.
निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले. या नळकांड्याचे कवच लागून जहांगीर अहमद वनी या युवकाचा मृत्यू झाला. या वेळी झालेल्या चकमकीत दोन जण जखमी झाले. तणावाचे वातावरण पाहता प्रशासनाने श्रीनगर शहर आणि हंडवाडातील सहा पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रात संचारबंदीसदृश निर्बंध जारी केले होते. मात्र, बैसाखी सणाच्या पार्श्वभूमीवर शीखधर्मीयांना त्यातून सूट देण्यात आली होती.

फुटीरवाद्यांचे बंदचे आवाहन : मंगळवारच्या गोळीबाराच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, पेट्रोल पंप बंद होते. लानगेट येथे निदर्शकांनी पोलिस चौकी पेटवून दिली. बहुतांश जिल्हास्थळी बंद पाळण्यात आला.

मेहबूबांना आश्वासन : मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिल्लीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. गोळीबाराची चौकशी केली जाईल आणि दोषींना शिक्षा केली जाईल, असे आश्वासन पर्रीकर यांनी त्यांना दिले.

जवानाने विनयभंग केला नाही : लष्कर
आपल्या जवानाने मुलीचा विनयभंग केला नाही, असा दावा लष्कराने बुधवारी केला. या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबाचा व्हिडिओ लष्कराने जारी केला. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुलीच्या जबाबावरून विनयभंगाचा आरोप खोटा होता, हे स्पष्ट होते. लष्कराची प्रतिमा खराब करण्यासाठी कोणी तरी तशी आवई उठवली. गोळीबारात चौघांचा मृत्यू झाल्याबद्दल प्रवक्त्याने खेद व्यक्त केला.

मुलीने दिलेला जबाब असा
लष्कराच्या व्हिडिओत मुलीने घटनेची माहिती दिली. ती म्हणाली, ‘आम्ही शाळेतून परतत होतो. मी मैत्रिणीकडे बॅग दिली आणि टॉयलेटमध्ये गेले. तेथून परतताना एका मुलाने मला थापड मारली तसेच शिवीगाळ केली. त्यामुळे अनेक जण गोळा झाले. त्यांनी मला पोलिस ठाण्यात जायला सांगितले. त्या वेळी टॉयलेटमध्ये लष्कराचा जवान नव्हता. त्या वेळी आमच्या ओळखीचे हिलालभाई होते. त्यांनी मला तू येथे काय करते आहेस, असा प्रश्न विचारला. तुम्ही माझ्या कुटुंबीयांना ओळखता, असे मी त्यांना सांगितले. पण दोघांनीही मला शिवीगाळ सुरूच ठेवली. ’
छायाचित्र : श्रीनगरमध्ये असा शुकशुकाट होता