नवी दिल्ली - गुजरातमध्ये पाटीदार पटेलांसाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या हार्दिक पटेलने राजकोटमध्ये रविवारी होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान च्या सामन्यासाठी खेळाडूंना मैदानावर जाऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. हार्दिक पटेल यांनी त्यांच्या समुदायातील लोकांना मॅचची तिकिटे दिली नसल्याचा आरोप केला आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तिकिटे संपल्याची घोषणा केली आहे. पण अनेक तिकिटांची अद्याप विक्री झाली नसल्याचा पटेल यांचा दावा आहे.
'क्रिकेटद्वारे भाजपचे राजकारण'
गुजरातमध्ये पटेलांसाठी आंदोलन करणाऱ्या हार्दिक पटेल यांनी भाजपवर क्रिकेटद्वारे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, भाजप सरकारने आतापर्यंत आंदोलन होणाऱ्या ठिकाणी सामना आयोजित करणार नाही असे म्हटले होते. पण आता सरकार मॅचच्या माध्यमातून राजकारण करत आहे. पटेल यांनी तिकिट विक्रीबाबत माहिती उघड करण्याची मागणी केली आहे. सर्व तिकिटे भाजप समर्थकांना दिल्याचा आरोप हार्दिक यांनी केला आहे.
कडक सुरक्षाव्यवस्था
हार्दिक पटेलच्या या धमकीनंतर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली आहे. मॅचसाठी स्टेडीयम आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ गुरुवारीच शहरात पोहोचले आहेत. राजकोट रेंजचे आयजी यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेडियमचे रस्ते आणि मॅच दरम्यान सुमारे 2000 सुरक्षारक्षक तैनात असतील. तसेच ड्रोन आणि तीन मानवविरहीत विमान 90 सीसीटिव्ही कॅमेऱ्यांसह निगराणी केली जाईल.