हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दादरीमध्ये झालेली घटना ही गैरसमजातून झाली असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले मुस्लीम या देशात राहू शकतात पण त्यासाठी त्यांनी बीफ खाणे बंद करावे लागेल. खट्टर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केले आहे. गाय, गीता आणि सरस्वती हे देशातील बहुसंख्य समुदायासाठी धार्मिक विश्वासाचे प्रतिक आहे असेही खट्टर म्हणाले. त्यामुळे मुस्लीमांनी राहावे पण या देशात त्यांनी बीफ खाणे सोडावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय घडले होते दादरीमध्ये...
गेल्या 28 सप्टेंबरला युपीच्या दादरीमध्ये बीफ खाल्ल्याच्या अफवेनंतर 52 वर्षांचे मोहम्मद अखलाक यांची मारून मारून हत्या केली होती. तसेच त्याच्या 22 वर्षांच्या दानीश नावाच्या मुलालाही मारून अर्धमेला केले होते. गावाच्या मंदिरातून अखलाक घरी बीफ साठवून ठेवत असल्याचे जाहीर करण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे.
आणखी काय म्हणाले खट्टर...
>खट्टर यांच्या मते दादरीची घटना गैरसमजामुळे घडली. असे व्हायला नको होते. चूक दोन्ही बाजुंची आहे. खट्टर यांनी दावा केला की, गायीबाबत वादग्रस्त बोल काढण्यात आले त्यानंतर लोकांचा राग अनावर झाला. एखाद्या व्यक्तीव हल्ला करणे आणि त्याची हत्या करणे चुकीचे आहेत, असेही ते म्हणाले.
>खट्टर म्हणाले की, जे या प्रकरणासाठी जबाबदार आहेत त्यांना कायद्यानुसार शिक्षा मिळेल. मात्र त्याचवेळी त्यांनी या घटनेतील गर्दीची तुलना आई किंवा बहिणीच्या अपमानामुळे रागावलेल्या लोकांशी केली. खट्टर यांच्या मते घटनेमागील कारणे समजायला हवी.
>लोकांच्या खाण्या पिण्यावर बंदी लादणे हे घटनात्मक अधिकांवर घाला घालण्याचा प्रकार नाही का असे खट्टर यांना विचारण्यात आले. त्यावर खट्टर म्हणाले की, स्वातंत्र्य असले तरी त्याच्या मर्यादा पाळल्या पाहिजे. जोपर्यंत दुसऱ्याला त्रास होत नाही, तेवढेच स्वातंत्र्य असते. बाफ खाणे म्हणजे दुसऱ्या समुदायांच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे. घटनात्मक अधिकाराद्वारेही तुम्ही तसे करू शकत नाही. दुसऱ्याला त्रास होईल असे तुम्ही काही करू शकत नाही, असे घटनेत लिहिले आहे.
>खट्टर असेही म्हणाले की, जर त्यांनी बीफ खाणे सोडले तर ते मुस्लिम राहणार नाहीत का ? मुस्लिमांनी बीफ खायलाच हवे असे कुठे लिहिलेले नाही. ख्रिश्चनांसाठीही त्यांनी बीफ खायलाच हवे असे कुठेही लिहिलेले नाही.