आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्षिताच्या हत्येचा कट माझ्या पतीने तिहार तुरुंगात रचला : बहिणीचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत- हरियाणातील नृत्यांगना हर्षिताच्या हत्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. हर्षिताच्या बहिणीच्या नवऱ्यानेच तिची हत्या केल्याचे समोर येत आहे. आपल्या पतीनेच हर्षिताची हत्या केली, असा आरोप तिची बहीण लताने केला आहे. 

लताचा नवरा दिनेश सध्या तिहार तुरुंगात असून पोलिस हत्येचे रहस्य उलगडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. लताच्या मते, ‘वडिलांचा सहा वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यानंतर हर्षिता दिल्लीच्या कराला गावात आमच्याकडे राहायला आली. २०१४ मध्ये तिच्यावर दिनेशने बलात्कार केला.’ आई प्रेमो यांनी दिनेशविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. दिनेशने दबाव टाकूनही प्रेमो यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे दिनेशने प्रेमो यांची गोळी झाडून हत्या केली. या हत्येच्या प्रकरणात हर्षिता साक्षीदार होती. दिनेशने तिहार तुरुंगातून हर्षिताच्या हत्येचा कट रचला, असे लताचे म्हणणे आहे.   

दबावानंतरही हर्षिताने माघार घेतली नाही  
हर्षिताची थोरली बहीण लताचे करालात आणि मधली बहीण मीनूचे बिजवासनमध्ये सासर आहे. आई आणि वडिलांच्या मृत्यूनंतर हर्षिता नरेलामध्ये मावशीकडे राहायला आली होती. दिनेशच्या भीतीने बहिणींनी हर्षिताशी संबंध तोडले होते. उदरनिर्वाहासाठी हर्षिता नृत्य आणि गायन करायची. यात तिला भरपूर यशही मिळाले आणि दिनेशविरोधात थेट लढा देण्याचे बळही मिळाले. दिनेश हर्षिताला फेसबुकवरून वारंवार धमकी द्यायचा, हे काही दिवसांपूर्वीच उघड झाले होते. तथापि, या प्रकरणात आणखी गूढ शोधण्यासाठी हरियाणा पोलिस तपास करत आहेत. हत्या होऊन दोन दिवस उलटूनही अद्याप पोलिस कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचू शकले नाहीत.  

दिनेशवर दिल्लीमध्ये ६  गुन्हेगारी खटले सुरू 
दिनेशवर हर्षिताची आई प्रेमो यांची हत्या, हर्षितावर बलात्कार आणि हत्येच्या प्रयत्नाचे ६ खटले दाखल आहेत. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी २५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. अद्याप कोणत्याही खटल्यात त्याला शिक्षा झाली नाही.   

हर्षितानेही दिनेशवर झाडली होती गोळी  
दिनेशच्या धमक्यांना त्रासून तसेच बलात्काराचा वचपा काढण्यासाठी २०१४ मध्ये हर्षिताने दिनेशवर गोळी झाडली होती. त्यात तो थोडक्यात बचावला होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी हर्षिताविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.   

दिनेशवर हत्येचा संशय, त्याची चौकशी करणार  
दिनेश हर्षिताला वारंवार हत्येची धमकी देत होता. तिच्या बहिणीनेही पतीवर हत्येचा आरोप केला आहे. प्राथमिक स्वरूपात आम्हालाही हत्येविषयी काही धागे मिळाले आहेत. दिनेशची चौकशी करू.   
- देशराज, डीएसपी (गुन्हे) पानिपत
बातम्या आणखी आहेत...