रोहतक - हरियाणातील रोहतक जिल्ह्यात एका 10 वर्षाची चिमुरडी 5 महिन्यांपासून गर्भवती असल्याचा प्रकार समोर आला आहे. या चिमुरडीवर तिच्याच सावत्र पित्याने वारंवार बलात्कार केला असे आरोप आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर येथील रुगणालयात उपचार सुरू असून तिची परिस्थिती अत्यवस्थ आहे.
आईला कळवले नराधम पित्याचे कृत्य
पीडित मुलीची आई बिहार येथून आलेली एक मजूर आहे. आपल्या मुलीची तब्येत बिघडल्यानंतर आईनेच तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी आणले. याचवेळी डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. यानंतर पीडितेने आपल्यावर झालेला अतिप्रसंग आईला सांगितला. त्यानुसार, नराधम सावत्र पिता गेल्या अनेक महिन्यांपासून तिचे शारीरिक शोषण करत होता. एवढेच नव्हे, तर हा प्रकार कुणालाही सांगू नकोस अशी धमकी सुद्धा दिली.
पोलिसांकडे तक्रार दाखल
यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाणे गाठले आणि क्रूरकर्मा बापावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
डॉक्टरांची बैठक
रोहतकच्या डॉक्टरांनी या समस्येवर सोमवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत 5 महिन्यांची गरोदर असलेल्या 10 वर्षीय मुलीवर कशा प्रकारे उपचार करण्यात यावे, आणि तिची सध्याची परिस्थिती कशी आहे, याचा आढावा घेण्यासाठी तज्ञांची मते सुद्धा घेतली जाणार आहेत.