आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IASच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न: हरियाणा BJP अध्यक्षांच्या मुलास व मित्रास पुन्हा अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणा भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाला तरुणीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले. - Divya Marathi
हरियाणा भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाला तरुणीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले.
चंदिगड- चंदिगड पोलिसांची पुरती नाचक्की झाल्यानंतर हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास आणि त्याच्या मित्रास पुन्हा अटक करण्यात आली. गुन्ह्यास पाच दिवस उलटून गेल्यानंतर अशी कारवाई करण्यात आली. 

आता त्यांना अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. बुधवारी दोघांविरुद्ध आयएएस अधिकाऱ्यांची मुलगी वर्णिका कुंडूचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचे कलम लावण्यात आले. ही कलमे जामीनपात्र आहेत. याआधी शनिवारी पाठलाग करणे आणि  रस्ता अडवणे असे गुन्हे लावण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना पोलिस ठाण्यातच जामिनावर सोडण्यात आले.  

चंदिगडचे पोलिस महासंचालक तेजेंद्र लुथरा यांनी सांगितले, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर विकास ४-५ ऑगस्टच्या रात्री वर्णिकाच्या कारचा पाठलाग करताना दिसला होता. याआधारे त्याच्यावर कलम ३६५ व ५११ लावण्यात आले होते. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दोघांवर भादंवि कलम ३५४ ड व मोटार वाहन कायदा १८५ नुसार शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

लुथरा म्हणाले, विकास बराला आणि त्याचा मित्र आशिष यास गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. अधिक चौकशीसाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात येणार आहे.  कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर नव्या आरोपाखाली पुन्हा अटक करण्यात आली. हे आरोप सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे ठेवण्यात आले. याशिवाय इतर बाबींचाही तपास चालू आहे.  

पोलिसांनी घराबाहेर चिकटवली नोटीस  
विकास चंदिगड पोलिसांना सापडला नव्हता. तेव्हा पोलिसांनी सुभाष बराला यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर नोटीस चिकटवली. त्यांचे अजून एक घर आहे. तेथेही विकासला पकडण्यासाठी छापे टाकण्यात आले होते.  

बराला यांनी अर्धवट सोडली पत्रकार परिषद  
विकासचे वडील सुभाष बराला यांच्यावर राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता. बुधवारी त्यांनी याच विषयावर पत्रकारांनाही घरी बोलावले होते. वर्णिका मला मुलीसारखीच आहे, असे सांगून सुभाष बराला म्हणाले, विकासवर कायदेशीर कारवाई होईलच. तेवढ्यात त्यांना फोन आला आणि ते पत्रकार परिषद अर्धवट सोडून निघून गेले. विकास त्याच वेळी पोलिस ठाण्यात होता हे उल्लेखनीय. त्याला अटक झाल्याची चर्चा होती. 

आराेपींना पोलिसांचे अजूनही संरक्षण 
सुभाष बराला चंदिगडच्या सेक्टर - ७ येथे मंत्र्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानी राहतात. त्यांचे तेथील वास्तव्य अनधिकृत आहे.  विकास आणि आशिष यांना वाचवण्याचा पोलिसांचा अजूनही प्रयत्न होतो आहे. हे आरोपी दुपारी २.३० च्या सुमारास आलिशान कारमधून पाेलिस ठाण्यात आले होते. त्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता. पोलिसांनी त्यांना कडे केले आणि बंदोबस्तात पोलिस ठाण्यात नेले. माध्यमाच्या प्रतिनिधींनाही त्यांना भेटू देण्यात आले नाही. त्यांची वैद्यकीय तपासणी होईल, असे पाेलिसांनी सांगितले.

विकासची लघवी आणि रक्त तपासणीचा नमुना दिला नव्हता
शनिवारी विकासला अटक केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचे रक्त व लघवी तपासण्याचा सल्ला दिला होता. विकास कायद्याचा विद्यार्थी आहे. त्याला कायदे माहिती आहेत. त्यामुळे त्याने रक्ताचा व लघवीचा नमुना देण्यास नकार दिला.  
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, वीरेंद्र सहवागने केले ट्विट 'कायदे में रहो गे, फायदे में रहो गे'
बातम्या आणखी आहेत...