आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप अध्यक्षांच्या मुलाने नशेत काढली मुलीची छेड; या गुंडांना धडा शिकवू... वडिलांचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड  - हरियाणात विकास बराला आणि त्याच्या मित्रांना आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलीची दारूच्या नशेत छेड काढल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. विकास हा हरियाणा  भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा आहे. अटक झाल्यानंतर लगेच त्याची सुटका करण्यात आली. हे प्रकरण शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी मुलीने न्यायालयात जबाब नोंदवला आहे. तथापि, चंदिगड पोलिसांनी अपहरणाचे आरोप असलेली दोन कलमे वगळली आहेत.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १२. ३५ वाजता ही घटना घडली. आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलीचा दोन तरुणांनी पोलिस नियंत्रण कक्षापर्यंत पाठलाग केला आणि तिची छेड काढली, अशी तक्रार तिने पोलिसांकडे केली. या दोन्ही आरोपींना कारसह अटक करण्यात आली. त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे रात्री उशिरा आयएएस अधिकारी पोहोचले. त्यांनी तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवून त्या तरुणांना अटक केली. तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तिच्या कारसमोर त्यांची कार थांबवून तिचा मार्ग राेखला. कारमधून एक तरुण उतरला. त्याने तिच्या कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. कारचा दरवाजा उघडला जात नसल्याचे पाहून त्यांनी कारच्या काचेवर जोरात  बुक्क्या मारल्या. ती मुलगी कारमध्येच घाबरलेल्या अवस्थेत बसून होती.  
 
तेवढ्यात पोलिस तेथे पोहोचले. त्यांनी या दोन तरुणांना पकडले. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय चाचणी केली. तेव्हा ते दोघे दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. विकास बराला चंदिगडच्या सेक्टर - ७ मध्ये राहत असून कुरुक्षेत्र विद्यापीठात एलएलबीचे शिक्षण घेत आहे.  दुसरा तरुण आशिष  हा भिवानीचा रहिवासी आहे. त्याने एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे.   
 
तरुणीने साेशल साइटवर टाकला तिच्यासोबत घडलेला प्रसंग  : तरुणीने संपूर्ण घटना सोशल साइटवर अपलोड केली आहे. तिने लिहिले, मी चंदिगड पोलिसांचे आभार मानते. त्यांनी त्वरेने कारवाई केली, अन्यथा आज असे स्टेटस लिहू शकले नसते. या शहरात जागोजागी कॅमेरे बसवलेले आहेत. दर २०० मीटर अंतरावर पोलिस असतात. ते बड्या राजकारण्यांचे बेटे होते म्हणून असा विचार तरी करू शकले. मी स्वत:ला नशीबवान समजते. अन्यथा.. माझ्यावर बलात्कार झाला नाही.. वा माझा खून झाला नाही.  
 
या गुंडांना धडा शिकवू... वडिलांचा निर्धार  
तरुणीचे वडील हरियाणा केडरचे वरिष्ठ आयएएस आहेत. त्यांनीही संपूर्ण घटना फेसबुकवर शेअर केली आहे. ही घटना आम्हा कुटुंबीयांना भयभीत करणारी आहे. माझ्या मुलीने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला, ते तरी बरे. तिला चंदिगड पोलिसांनी वेळेवर मदत केली. या घटनेमुळे माझ्या मुलीला धक्का बसला आहे. तिला यातून सावरण्यास वेळ लागेल. दोन मुलींचा पिता या नात्याने मी हे प्रकरण लावून धरणार आहे. या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे. कायदा आपले काम करेल. गुुंडही प्रभावशाली घराण्यातील आहेत.
बातम्या आणखी आहेत...