जयपूर - दैनिक भास्कर आणि जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय हिंदी लेखन स्पर्धेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. हरियाणाचे नवरत्न पांडे, इंदूरचे डॉ. सरोज बिल्लौरे आणि भोपाळच्या अंकिता त्रिपाठी विजेत्यांमध्ये टॉप-३ राहिले. विजेत्यांना दैनिक भास्करच्या वतीने २१ ते २५ जानेवारीपर्यंत आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. त्याशिवाय इतर सात जणांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
दैनिक भास्करच्या वतीने अखिल भारतीय हिंदी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘हिंदी में अन्य भाषाओं के शब्दों का प्रचलन, हिंदी के लिए आशीर्वाद या अभिशाप’ या विषयावर लेख मागवण्यात आले होते. त्यात देशभरातून हजारो प्रवेशिका आल्या होत्या. विजेत्यांची निवड तीन टप्प्यांत करण्यात आली. पहिल्या टप्प्यात दैनिक भास्करच्या संपादकीय टीमने प्रवेशिकांची छाननी केली. दुस-या टप्प्यात परीक्षकांनी त्याचे मूल्यमापन केले. परीक्षकांच्या पॅनलमध्ये राजस्थान विद्यापीठाचे निवृत्त प्रोफेसर डॉ. सरस्वती माथुर, प्रो. वीरबाला भावसर, महिला साहित्य संस्था स्पंदनच्या अध्यक्षा नीलिमा टिक्कू यांचा समावेश होता. तिस-या टप्प्यात दैनिक भास्करच्या संपादकीय विभागातील समितीने टॉप तीन विजेत्यांची नावे काढली. प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून भिलवाड्याचे अर्पित कचौलिया, भोपाळच्या पूजा कुशवाह, कुरुक्षेत्र डॉ. रवीशकुमार चौहान, उदयपूरच्या दीपिकाकुमारी सेवक, पानिपतच्या एकता रोहिल्ला, अजमेरचे मनीषकुमार चौहान, उज्जैनचे शुभम शर्मा. दैनिक भास्कर जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ‘भास्कर भाषा सिरीज’चेही आयोजन करेल.