आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाचे ओझे डोक्यावर घेऊन धावला रतिराम..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - पहिल्याच आंतरराष्‍ट्रीय स्पर्धेत राजस्थानचा धावपटू रतिराम सैनीने देशाला पदक मिळवून दिले. मात्र, तो सध्या आपले करिअर उज्ज्वल करण्यासाठी व कुटुंबीयांना सुखाचे चार घास खाऊ घालण्यासाठी बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे. अलवर जिल्ह्याच्या डेरा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रतिरामने पुणे येथील आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. त्याने पुरुषांच्या दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरे स्थान पटकावले. त्याची करिअरमधील ही पहिली आंतरराष्‍ट्रीय स्पर्धा होती.


‘कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी मी धावण्याला सुरुवात केली होती. मात्र, आता आंतरराष्‍ट्रीय स्तरावर देशाला पदक मिळवून देण्याचे लक्ष्य ठरवले आहे. बिकट आर्थिक परिस्थिती यात अडसर ठरत आहे. मी सध्या लखनऊ येथे नॉर्दर्न रेल्वेमध्ये टेक्निशियन पदावर कार्यरत आहे. तुटपुंज्या वेतनामुळे मी सरावदेखील चांगल्या प्रकारे करू शकत नाही. कुटुंबीयांच्या पालनपोषणाचीही जबाबदारी माझ्यावर आहे’, असे तो म्हणाला.


2004 पासून धावण्यास प्रारंभ
रतिराम म्हणाला की, 2004 मध्ये शालेय स्तरावरील स्पर्धेत धावण्याला प्रारंभ केला होता. 2005 मध्ये आंतरविद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 5 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होेते. 2006 मध्ये खेळाडूच्या राखीव कोट्यातून मला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. 2010 पासून दहा हजार मीटरमध्ये धावण्याला सुरुवात केली. दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये कांस्यपदक जिंकले होते.


चार मुलींचा पिता
रतिरामला चार मुली आहेत. त्याच्यावर वडिलांच्या पालनपोषणाचीही जबाबदारी आहे. झाडावरून पडल्याने जखमी झालेल्या वडिलांच्या उपचारावर अधिक खर्च झाला आहे. रतिरामचे कुटुंबीय अद्यापही मातीच्या घरात राहतात.


मदतीची आशा
रतिरामला केंद्र शासन किंवा कॉपोरेट कंपनीकडून मदतीची आशा आहे. कॉर्पोरेट कंपन्या खेळाडूंना प्रायोजकत्व देत आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. मलाही असे प्रायोजकत्व मिळाल्यास चांगला सराव करून देशाला पदक मिळवून देऊ शकतो, असे तो म्हणाला.