आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वखर्चातून सरकारी शाळेला हायटेक करणारे मुख्याध्यापक, वेब कॅमे-याद्वारे शिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाजापूर - ध्येय निश्चित असेल तर कुठलाही अडथळा येत नाही. शाजापूरच्या सरकारी माध्यमिक शाळेचे शिक्षक मनोहरलाल राय यांच्याकडून तरी हाच संदेश मिळत आहे. त्यांनी खासगी शाळांची स्तुती ऐकली आणि या शाळेपेक्षाही मी माझी शाळा चांगली बनवेन, असा निर्धार केला. यंत्रणेकडून मदत मिळाली नसल्याने स्वखर्चातून शाळा हायटेक करण्यास सुरुवात केली.

राय यांनी त्यादृष्टीने वर्षभर मेहनत केली. परिणामी शाळेत वेब कॅमे-याद्वारे सहावी ते आठवीच्या २४० विद्यार्थ्यांचा अर्ध्या तासाचा विशेष वर्ग भरतो. शिकवलेले व्यवस्थित ऐकू यावे म्हणून प्रत्येक वर्गात स्पीकर लावले आहेत. विषयाशी संबंधित व्हिज्युअल दिसावेत यासाठी रंगीत टीव्हीही लावले आहेत. चार वेगवेगळ्या कक्षांतील कॅमे-यांनी मॉनिटरिंगही होते. हा बदल घडवणारे ५७ वर्षीय मनोहरलाल राय शाळेचे मुख्याध्यापक आहेत. या हायटेक यंत्रणेमुळे अध्ययन- अध्यापनासाठी चांगली सुविधा झाली आहे. शाळेचे चार कक्षांचे रूपांतर ‘स्मार्ट क्लास’ मध्ये झाले आहे. राय सांगतात, ‘मुलांच्या सामान्य ज्ञानात भर घालणारी बरीच माहिती इंटरनेटवर असते. मी असे अनेक व्हिडिओ, फोटो आणि कंटेंट डाउनलोड केले आहेत.

मुख्य संगणकात विषयाच्या हिशेबाने १३ फोल्डर बनवले आहेत. प्रत्येक फोल्डरमध्ये ५० पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. ते विशेष वर्गात दाखवले जातात. आठवड्यात तीन दिवस वेब कॅमद्वारे शिकवले जाते. या पद्धतीमुळे मुलांमध्येही उत्साह असून, विषय समजून घेणे सोपे झाले आहे. शिकण्यात लक्ष लागते.’ या विचारामागील उद्देश सांगताना राय म्हणाले, ‘सरकारी शाळांची प्रतिमा नकारात्मक झालेली असते. मला ती बदलायची होती.

जवळपासच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थीही येथे येतात. विद्यार्थ्यांना बातम्यांव्यतिरिक्त देश-जगातील आवश्यक मोठ्या घटनाही दाखवल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान वाढते. त्याचबरोबर क्रिकेट-फुटबॉलचे महत्त्वाचे सामनेही दाखवले जातात.’