देशातील उत्तर-पूर्वेकडील राज्यांना पुराचा तडाखा बसला आहे. आसाममध्ये आजवर ४५ लोक दगावले आहेत, तर १७ लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत. सुमारे ४३० चौरस मीटर इतके विस्तीर्ण असलेले काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पुराने वेढले गेले आहे. तेथील हत्ती, गेंडे, हरणांसह अनेक प्राणी कार्बी हिल्सकडे गेले आहेत. मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या बेटावरील माझुली येथील निर्वासितांच्या छावणीला भेट दिली होती. अरुणाचल प्रदेशातही पूर आला असून तेथे दरडी कोसळत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्याचा राज्याशी असलेला संपर्क तुटला आहे. उत्तर पूर्वेकडील राज्यात पाऊस आणि त्यामुळे झालेल्या घटनांमध्ये आजवर ८० लोक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.