आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूमध्ये पावसाचा जाेर कायम, बळींची संख्या ८७ वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नऊ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या पाऊस आणि पुरामुळे राज्यात आतापर्यंत ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावरून नौका दिसत आहेत.
चेन्नई, कुड्डालोर, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि आसपासच्या भागात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुद्दुचेरीमध्येही मुसळधार आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या पूरग्रस्त भागात मंगळवारपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मदत व बचावकार्यासाठी राष्ट्रीय प्रतिसाद दल(एनडीआरएफ) आणि हवाई दलाची मदत घेतली जात आहे. एनडीआरएफने चेन्नईत ३८ रबर बोट उतरवल्या आहेत. हवाई दलाच्या जवानांनी पुरात अडकलेल्या २२ लोकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. यादरम्यान मुख्यमंत्री जयललिता यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्थितीचा आढावा घेऊन मदत आणि बचाव कार्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

वाहतूक विस्कळीत
मुसळधार पावसामुळे रहदारीवर परिणाम झाला आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. तामिळनाडू किनारपट्टी क्षेत्रातील बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. २४ तासांत मान्सून वायव्य दिशेला सरकेल.

रेल्वे सेवेवर परिणाम
मुसळधार पावसामुळे दक्षिण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. सोमवारी काही गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काहींचे मार्ग बदलावे लागले. चेन्नई इगमोर- काकीनाडा पोर्ट सिरकार एक्स्प्रेस, चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस, चेन्नई पुरी वीकली एक्स्प्रेस, चेन्नई सेंट्रल-जनशताब्दी एक्स्प्रेस गाड्या रद्द झाल्या.

दहा हजार मच्छीमारांची मासेमारी बंद
जयललिता यांनी नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले आहे. नागापट्टणम जिल्ह्यातील शेकडो एकरांवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. पाऊस आणि हवामानाच्या रौद्ररूपात सुमारे १० हजार मच्छीमारांनी सलग चौथ्या दिवशी समुद्रात जाणे टाळले आहे. आपत्कालीन स्थितीत १२ छावण्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ आयएएस अधिकारी शिवदास मीणा यांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके पुम्पुहार, कोलिदाम आणि सरकाझी भागात तैनात करण्यात आली आहेत.