आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीआरपीएफला हेलिकॉप्टर, जम्मू पोलिसांना बुलेटप्रूफ वाहने देणार: राजनाथ सिंह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलाच्या समस्या सोडवण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे. म्हणूनच जम्मू-काश्मीरच्या पोलिसांना बुलेटप्रूफ वाहने उपलब्ध करून दिली जातील. त्यासाठी केंद्राने निधीची तरतूद केली आहे, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. शनिवारी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात पोलिसांसोबत त्यांनी संवाद साधला. त्या प्रसंगी ते बोलत होते.  

१६ जून रोजी अनंतनाग जिल्ह्यातील अचाबल येथे फिरोज अहमद या पोलिस अधिकाऱ्याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ यांनी ही घोषणा केली. केंद्र सरकार राज्यातील पोलिसांच्या प्रश्नाची धग समजू शकते. पोलिसांना खोऱ्यात अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत काम करावे लागते.  म्हणूनच सरकारने बुलेटप्रूफ वाहने पुरवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तरतूददेखील करण्यात आली आहे. पोलिसांसाठी ट्रॉमा सेंटरही सुरू करण्याची घोषणा राजनाथ यांनी केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एएसआय अब्दुल रशीद व कॉन्स्टेबल इम्तियाज शहीद झाले होते. राजनाथ यांनी त्यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण केली. काश्मीरसाठी त्यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. अशा पोलिसांच्या बलिदानाचा आम्हाला गर्व आहे. तुम्ही अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीशी झुंज देत आहात. तुमच्या शौर्याचे पंतप्रधानांनीदेखील कौतुक केले आहे, असे राजनाथ यांनी सांगितले. राजनाथ चार दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर शनिवारी दाखल झाले.  

राजनाथ चर्चेतून काश्मीरचे  प्रश्न सोडवतील : भाजप  
गृहमंत्री राजनाथ सिंह सर्व गटांशी चर्चा करून काश्मीरचे प्रश्न सोडवतील. खुल्या मनाने ते सर्वांशी चर्चा करण्यासाठी उत्सुक आहेत. कोणत्याही समुदायातील लोकांशी चर्चा करण्याची तयारी त्यांनी अगोदरच दर्शवली आहे. ही राज्यातील जनतेसाठी चालून आलेली एक संधी आहे, असे प्रदेश भाजपचे सरचिटणीस अशोक कौल यांंनी म्हटले आहे.  

काँग्रेसचे नेतेही जम्मूत दाखल, मनमोहन सिंग चर्चा करणार 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रविवारी जम्मूत दाखल झाले. हिंसाचारानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी ते स्थानिक नेते, प्रत्येक गटाशी चर्चा करणार आहेत.

सीआरपीएफसाठी अनेक घोषणा  
जम्मू-काश्मीरमध्ये तैनात केंद्रीय राखीव पोलिस दलास हेलिकॉप्टरची सुविधा देण्याचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन आहे. लवकरच ही सुविधा पुरवली जाईल. त्याशिवाय कर्तव्यावर असताना बलिदान देणाऱ्या जवानाच्या कुटुंबीयांना भविष्यात १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येईल. आता सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एनएसजी, आसाम रायफल्स यांना ६०-७० लाख रुपये दिले जातात. त्या रकमेत वाढ करण्याचे सरकारने ठरवले आहे, असे राजनाथ म्हणाले. सीआरपीएफच्या जवानांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  
बातम्या आणखी आहेत...