मथुरा - वृंदावनातील विधवांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत; परंतु त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही.
आपण या विरोधात आवाज उठवू इच्छितो; परंतु आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, असे स्पष्टीकरण भाजपच्या खासदार हेमामालिनी यांनी दिले आहे. ‘दिव्य मराठी नेटवर्क’शी बोलताना हेमामालिनी म्हणाल्या की, वृंदावनात ५००० पेक्षा जास्त विधवा आहेत. त्यापैकी बहुतांश विधवा पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आदी राज्यांतून आल्या आहेत. त्या सधन कुटुंबातील असून त्यांच्या लोकांनीच त्यांना घराबाहेर काढले आहे.
हेमा म्हणाल्या, ‘ज्या संघटना माझ्या विधानाचा विरोध करत आहेत त्यांनी वृंदावनात येऊन बघावे की या विधवांचे काय हाल होतात. त्यांची अवस्था पाहिली, तर तेही दु:खीकष्टी होतील. मला चुकीचे ठरवल्याने किंवा माझ्या विरोधात निर्दशने केल्याने हे वास्तव बदलणार नाही, हे त्यांनी
समजून घ्यावे. येथील खासदार असल्याने मी माझ्या जबाबदारीशी बांधिल आहे. जे योग्य आहे तेच मी करेन.