आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Himachal Pradesh News In Marathi, 24 Student Dead In River

10 मिनिटात गेले 24 जीव; हिमाचल प्रदेशात आंध्रप्रदेशचे विद्यार्थी बुडाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंडी- हैदराबादहून सहलीसाठी आलेले 24 विद्यार्थी बियास नदीत वाहून गेल्याची दुर्घटना येथे घडली. धरणात पाणी सोडल्याचा इशारा वा माहिती न समजल्याने अवघ्या काही क्षणांत हे विद्यार्थी वाहून गेले. हैदराबाद येथील बीटेक द्वितीय वर्षात शिकणारे 48 विद्यार्थी, तीन प्राध्यापक आणि एक टूर ऑपरेटर मनालीकडे जात होते. या दरम्यान ही दुर्घटना घडली. मदतकार्यात पाच जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप 19 जण बेपत्ता आहेत.

‘आम्ही नदीपात्रात उतरलो तेव्हा खूप कमी पाणी होते. पात्रातील खडकावर बसून एकमेकांची छायाचित्रे काढत होतो. नदीच्या मधोमध असलेल्या खडकावर जाण्यासाठी मित्र जोर धरत होते. काही अवधीनंतर पाणी पातळी वाढली. मी बाहेरच्या दिशेने पळाले. स्थानिक लोक मदतीसाठी धावले. मात्र, आमचा घोळका मोठा होता, त्यामुळे सर्वांना बाहेर काढता आले नाही. 10-15 मुले माझ्या डोळ्यांदेखत वाहत गेली. पाण्यात एक डोके दिसल्यावर त्या दिशेने दोर फेकला. मात्र, तोपर्यंत तो दिसेनासा झाला. बसमधून उतरल्यानंतर 10 मिनिटांच्या आत ही घटना घडली. आम्ही आमचे 24 मित्र गमावले.’ बियास नदीवर बांधलेल्या लारजी धरणातून पाणी सोडल्यामुळे रविवारी सायंकाळी ही दुर्घटना झाली.यात बचावलेल्या टी. व्ही. सुहर्षाने हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग सांगितला.

सहलीचा आनंद हिरावून घेणार्‍या घटनेमुळे सुहर्षाला अश्रू आवरणे कठीण झाले होते. ती म्हणाली, आम्ही मित्रांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, काही सेकंदांत पाणी पातळी 5-6 फुटांपर्यंत वाढली. धरणातून पाणी सोडल्याचा इशारा वेळेत मिळाला असता तर आमचे मित्र आमच्यासोबत असते. हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी सोमवारी बचावलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. प्रकल्प अधिकार्‍यांनी इशारा अलार्म वाजवला होता, असा दावा त्यांनी केला. मात्र, नदीकिनारी कोणतीही माहिती दिली नव्हती आणि अलार्म वाजला नव्हता.
पाच मृतदेह सापडले, 19 अद्याप बेपत्ता
रविवारी सायंकाळी सुरू करण्यात आलेल्या मदतकार्यात पाच विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले असून अद्याप 19 जण बेपत्ता आहेत. या मोहिमेत एसएसबीच्या दोन तुकड्या, पोलिस, होमगार्डसह स्थानिक पाणबुड्यांची मदत घेतली जात आहे. यामध्ये 24 विद्यार्थी बियास नदीत वाहून गेले.

चौकशीचे आदेश, तिघे निलंबित
मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी विभागीय आयुक्तांना दंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्घटनेला जबाबदार कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यासाठी तसेच भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी हे आदेश बजावण्यात आले. याबरोबर 126 मेगावॅटच्या लारजी जलविद्युत प्रकल्पातील दोन वरिष्ठ अभियंते आणि एका फिटरला निलंबित केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी घटनास्थळी जाऊन विचारपूस केली. त्यांनी केंद्राकडून हिमाचल सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. चौकशी अहवाल आल्यानंतर मतप्रदर्शन केले जाईल, असे इराणी म्हणाल्या.