आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Temples Well maintained In Pakistan: Reema Abbasi

पाकिस्तानात हिंदू मंदिरे चांगल्या स्थितीत, लेखिका रिमा अब्बासी यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पाकिस्तानातील हिंदू मंदिरांची स्थिती चांगली आहे. सरकारकडून त्यांची सुरक्षा आणि देखभालही घेतली जाते. परंतु अलीकडे त्यांच्यावर बिल्डरांचा डोळा असल्याची माहिती पाकिस्तानी पुरातत्व अभ्यासक तथा लेखिका रिमा अब्बासी यांनी दिली.
पाकिस्तानातील सरकार हिंदू मंदिरांची संपूर्ण काळजी घेते. त्यामुळे ही मंदिरे सुस्थितीत आढळून येतात. परंतु आता जुने कारागीर मिळेनासे झाले आहेत. म्हणून क्वचित कोठे डागडुजी करायची म्हटल्यावर जुन्या पद्धतीने होऊ शकत नाही. त्यामुळेच त्यांचा संपूर्ण जीर्णोद्धार करणे कठीण बनले आहे, असे अब्बासी यांनी सांगितले. ‘हिस्टॉरिक टेम्पल्स इन पाकिस्तान : अ कॉल टू कॉनसायन्स’ या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. त्या रविवारी वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. जीर्णोध्दारासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात. उदाहरण कराचीतील जुन्या वसाहतीमध्ये असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराचे देता येईल. एमक्यूएम पार्टीने या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम हाती घेतले होते. कोलाकाता लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी त्या रविवारी भारतात आल्या आहेत.
रिअल इस्टेटची वक्रदृष्टी : पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याकांच्या भावनाचा विचार करून सरकार मंदिरांची देखभाल सुरक्षा करते. परंतु तेथील बिल्डरांची त्या जागांवर नजर आहे. बहुतेक मंदिरे हे रिअल इस्टेटच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळेच त्यांना अशा ठिकाणी हॉटेल, शॉपिंग मॉल्स उभे करण्याची इच्छा आहे. त्यांचा जागा बळकावण्याचा प्रयत्न असतो. त्यातून अंतर्गत छोटे-मोठे संघर्षही होतात, असे अब्बासी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पाकिस्तानात हिंदू समुदाय अल्पसंख्यांक आहे. हिंदूसह शीख धर्मिय देखील अल्पसंख्यांकामध्ये येतात. हिंदूंची अनेक प्राचीन मंदिरेही पाकिस्तानात आहेत. फाळणीपूर्वी ही मंदिरे भारतामध्ये येत होते. परंतु फाळणीनंतर मंदिरांच्या दुरावस्थेच्या बातम्या प्रसिद्ध होत. त्यावर अब्बासी यांनी अभ्यास करून शास्त्रीय माहिती प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे.
चार प्रांत पालथे घालून करून अभ्यास
लेखिका रिमा अब्बासी मूळच्या पत्रकार. परंतु पौराणिक वास्तूंच्या अभ्यासाची त्यांना आवड असल्याने त्यांनी पाकिस्तानातील बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा, पंजाब आणि सिंध या प्रांतात भटकंती केली. या सर्व प्रदेशात असलेल्या जुन्या मंदिरांची स्थिती, त्यांची देखभाल इत्यादी मुद्द्यांच्या त्यांनी सविस्तर नोंदी घेऊन पुस्तकात विवेचन केले आहे. त्यांच्या पुस्तकात मंदिरांची सुमारे ४०० छायाचित्रे आहेत. त्यातून पाकिस्तानातील हिंदू संस्कृतीचे दुर्लभ दर्शन घडते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो.