आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद हे भ्याडांचे शस्त्र, गृहमंत्र्यांनी पाकला सुनावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेटर नोएडा- पाकिस्तानकडून सातत्याने छुपे युद्ध करून भारताला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी दहशतवादाचा वापर केला जातो. परंतु दहशतवाद हे भ्याडांचे शस्त्र आहे, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.

शेजारी देशाकडून नेहमीच छुपे युद्ध करण्याचा प्रयत्न होतो. पाठीमागून हल्ला करण्याला काहीही अर्थ नाही. युद्ध करायचे असल्यास निधड्या छातीने सामोरे जावे लागते. त्यासाठी शाैर्य लागते. पाकिस्तानकडे ते नाही. म्हणूनच दहशतवादाचा भ्याडपणे वापर केला जात आहे, असे राजनाथ यांनी म्हटले आहे. शुक्रवारी ५५ व्या इंडो-तिबेटन सीमा पोलिस (आयटीबीपी) स्थापना दिनाच्या समारंभात ते मार्गदर्शन करत होते.

आयटीबीपीच्या जवानांनी यंदा सीमेवर अतिशय कडक निगराणी केली. त्यामुळे सरहद्द भागातील चिनी आक्रमकतेच्या घटना ६० टक्क्यांहून कमी झाल्याचे दिसून आले. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून हे कृत्य केले जाते. त्याचा संदर्भ देऊन राजनाथ म्हणाले, भारत-पाकिस्तानमधील तणावाचा चीन फायदा घेऊ इच्छितो. परंतु चीनच्या मदतीने पाकिस्तानकडून कितीही वेळा गोळीबार झाला तरी भारतीय सैनिक त्यांना योग्य त्या भाषेत उत्तर देण्यास सक्षम आहेत, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे या जवानांसाठी सरकार सातत्याने कल्याणकारी उपाययोजना करत आहे.

परदेशी मोहिमेचे कौतुक
भारताच्या परदेशातील मोहिमेत आयटीबीपीने महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्याबद्दल राजनाथ यांनी जवानांचे कौतुक केले. अफगाणिस्तानातील राजदूत कार्यालयाजवळील दहशतवादी हल्ले उधळून लावण्यात आयटीबीपीला यश आले आहे. मझार-ए-शरीफ जलालाबादमधील हल्ले उधळण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...