पंचकुला/चंदिगड - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्या मानसकन्या हनीप्रीतला पोलिसांनी अटक केली आहे. राम रहीम यांना साध्वी बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर पंचकुला व सिरसामध्ये उसळलेल्या हिंसाचारात ४१ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी देशद्रोह व हिंसाचार पसरवल्याचा खटला सुरू आहे.
४३ वाँटेड आरोपींच्या यादीत हनीप्रीतचे नाव सर्वात पुढे आहे. ३८ दिवसांपासून फरार हनीप्रीतला मंगळवारी जीकरपूर-पातियाळा रोडवरून अटक करण्यात आली. तिला बुधवारी कोर्टापुढे सादर केले जाईल. पोलिस हिंसाचारातील तिची भूमिका तपासतील. ती ३८ दिवस कुठे थांबली व तिला कुणी मदत केली, याचीही चौकशी केली जाईल.
हनीप्रीत तीन दिवसांपासून डेराबस्सी व मोहाली भागातच होती. तिला पंजाबच्या अनेक नेत्यांची मदत होती. दोन दिवस एका फ्लॅटमध्ये व नंतर बंगल्यात राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तीन वाहने तिच्या सेवेत होती. तिच्या कारच्या काचा कपड्यांनी झाकून ठेवण्यात आल्या होत्या. दोन रात्रींपासून ती रात्रीच्या वेळेत चंदिगडच्या सीमावर्ती भागात जेवत होती. तिला मदत करणाऱ्या नेत्यांच्या सांगण्यावरूनच हनीप्रीतचा पंजाब पोलिसांशी संपर्क साधून देण्यात आला. पंजाब पोलिसांशी संपर्क झाल्यानंतर हनीप्रीत कसौलीकडे निघाली होती. हरियाणा व पंजाब पोलिसांच्या महासंचालकांत चर्चा झाली. त्यानंतर हनीप्रीतचे लोकेशन मिळाले आणि पंचकुला पोलिसांनी तिला अटक केली.
पंचकुला पोलिस आयुक्त काय म्हणाले
- पंचकुला पोलिस आयुक्त पी.सी. चावला म्हणाले, हनीप्रीतला पटियाला ते जीरापूर येथून अटक करण्यात आली आहे. तिच्या सोबत आणखी एक महिला होती. तिचे नाव आताच उघड करता येणार नाही. आजपासून तिची चौकशी सुरु होईल. उद्या हनीप्रीतला कोर्टात हजर केले जाईल.
- 'हरियाणा एसआयटीचे एसीपी मुकेश यांना माहिती मिळाली होती की हनीप्रीत इनोव्हा कारने प्रवास करत आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता दरम्यान तिला अटक करण्यात आली. चौकशीसाठी महिला अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. ते तिची चौकशी करतील. आदित्य आणि पवन इन्सा यांचा अद्याप शोध सुरु आहे.'
हनीप्रीत म्हणाली, पापांसोबत पवित्र नाते आहे
अटकेच्या काही तासांपूर्वी हनीप्रीतने दोन चॅनल्सना मुलाखती दिल्या. कारमध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने अाराेपांचे स्पष्टीकरण दिले. चार प्रमुख आरोपांवरील तिचे स्पष्टीकरण असे..
- कट रचल्याचा आरोप
मीडिया जसे दाखवत आहे, हनीप्रीत तशी नाही. जे दाखवले जात आहे, त्यामुळे मी खूप घाबरले आहे. संध्याकाळपर्यंत परत येऊ असा विचार करून मी कोर्टात गेले होते. विरुद्ध निकाल लागल्याने विचार करणेच बंद झाले. आपल्या बाबांसोबत एक मुलगी गेली हाेती. इतकी सुरक्षा व्यवस्था असताना विनापरवानगी कुणी कसे सोबत जाऊ शकेल? सर्व पुरावे समोरच आहेत. दंगलींत माझा कुठे सहभाग होता? माझ्याविरुद्ध काय पुरावे आहेत? मी फक्त एका मुलीचे कर्तव्य निभावत आहे.
- राम रहीम व हनीप्रीत यांचे नाते
बापलेकीचे पवित्र नाते बदनाम केले जात आहे. एक पिता मुलीच्या डोक्यावर हात ठेवू शकत नाही का? मुलगी वडिलांवर प्रेम करू शकत नाही का?
- डेऱ्याचे लोक व गुप्ताचे आरोप
जी डेऱ्याची खास माणसे आहेत, ती खरीच खास आहेत का? विश्वास गुप्ताच्या मुद्द्यावर मला काहीही बोलायचे नाही.
- पोलिसांना का गुंगारा दिला?
मी नैराश्यात होते. काय करावे, हेच कळत नव्हते. जी मुलगी पित्यासोबत देशभक्तीच्या गोष्टी करायची, तिच्यावरच देशद्रोहाचे आरोप केले गेले. मला कायदेशीर प्रक्रियेची माहितीही नाही. लोकांनी जे मार्गदर्शन केले त्याचे मी पालन केले. मानसिक स्थिती सावरण्यासाठी काही वेळ लागतोच...
हनीप्रीतचा सवाल - एक मुलगी आपल्या वडिलांवर प्रेम करु शकत नाही का ?
हनीप्रीत मंगळवारी सर्वप्रथम टीव्ही चॅनलवर आली. बाबा आणि तिच्या नात्यासह डेरा सच्चा सौदामधील गौडबंगाल, आश्रमात मानवी सापळे सापडण्याचे सर्व आरोपी तिने फेटाळून लावले. मुलगी आणि वडिलांचे नात्याची जाहीर विटंबना केल्याचा आरोप तिने केला.
- हनीप्रीत म्हणाली, ज्या पद्धतीने हनीप्रीत दाखवण्यात आली ते पाहून मला स्वतःचीच भीती वाटायला लागली होती. मी माझी मानसिकस्थिती सांगू शकत नाही. मला देशद्रोही म्हटले गेले. हे सपशेल चूक आहे. एक मुलगी तिच्या वडिलांसोबत कोर्टात जाते, तिथे बंदोबस्त असतो. कोणालाही परवानगीशिवाय जाऊ देतील का? असा सवाल तिने केला.
- दंगल भडकावण्याच्या आरोपाचा इनकार करताना हनीप्रीत म्हणाली, मी कुठे होते. सर्व पुरावे जगासमोर आहेत. अशात मी दंगलीत कशी सहभागी असू शकेल. माझ्याविरोधात कोणाकडे काय पुरावे आहे? तुम्हाला कोणी सांगितले का मी दंगल करण्याचे कोणाला सांगितले? आम्हाला तर वाटले सकाळी कोर्टात जायचे, सायंकाळी परत येऊ.
कोण आहे हनीप्रीत इन्सा
- हनीप्रीतचे वडील रामानंद तनेजा आणि आणि आशा तनेजा हे फतेहाबाद येथील रहिवासी आहेत. हनीप्रीतचे खरे नाव प्रियंका तनेजा आहे.
- हनीप्रीतचे वडील राम रहिमचे भक्त आहेत. त्यांनी त्यांची सर्व संपत्ती विकून डेरा सच्चा सौदामध्ये एक दुकान सुरु केले.
- 14 फेब्रुवारी 1999 मध्ये हनीप्रीत आणि विश्वास गुप्ताचे एका सत्संगात लग्न झाले. त्यानंतर बाबाने हनीप्रीतला आपली तिसरी मुलगी घोषित केले.
- हनीप्रीतने राम रहिमच्या प्रॉडक्शनमध्ये तयार झालेल्या चित्रपटांमध्ये अॅक्टिंग केली होती त्यासोबतच डायरेक्शनही करत होती. असे म्हटले जाते की हनीप्रीत डेरा सच्चा सौदामध्ये आल्यानंतर तिच्याशिवाय बाबाचे पान हलत नव्हते.
- हनीप्रीतचा गुप्तासोबत घटस्फोट झालेला आहे. बाबा तुरुंगात गेल्यानंतर विश्वास गुप्ताने एका पत्रकार परिषदेत हनीप्रीत आणि राम रहिम यांच्या अवैध लैंगिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचा दावा आहे की त्याने दोघांना आपत्तीजनक स्थितीत पाहिले होते.
- राम रहिमला सीबीआयच्या पंचकुला कोर्टाने साध्वी बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर हरियाणात दंगल उसळली होती. मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. हनीप्रीतवर दंगलीचे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे.