छायाचित्र: विशाखापट्टणम भागातील मासेमारी आणि जलवाहतूक तीन दिवसांपासून ठप्प आहे.
विशाखापट्टणम - ‘हुदहुद’च्या तडाख्यानंतर आंध्र प्रदेशातील पीडित शेकडो नागरिक मंगळवारी मदतीसाठी आलेल्या वाहनांवर तुटून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. खाद्यपदार्थ घेऊन आलेल्या वाहनावर प्रशासनाचे नियंत्रण दिसून आले नाही. दुसरीकडे काळ्या बाजारात तेजी आली असून जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत.
रविवारी चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर अनेक भागांतील पीडितांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. खासगी संस्थांमार्फत आलेल्या मदतीची लूट झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे केंद्र सरकारच्या वतीने अद्याप अन्नपदार्थ पाठवण्याचे काम सुरू झालेले नाही; परंतु लवकरच गरजूंपर्यंत अन्नसाठा पुरवला जाईल, असे अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी स्पष्ट केले. अन्न मंत्रालयाच्या अंतर्गत संकटात असलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पासवान यांनी दिले. सरकारी गोदामांत गहू आणि तांदूळ मिळून सुमारे ४ कोटी ७० लाख टन एवढा धान्य साठा असल्याचे सांगण्यात आले.
पाणी ५० रुपये लिटर
चक्रीवादळाने हैराण झालेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काळाबाजार जोरात असून पाणी आणि दूध चढ्या दराने विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. एक लिटर पाणी ५० रुपये देऊन विकत घेण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर केरोसीन, साखर, डाळ, बटाटे, कांदे, पाम तेल इत्यादी पदार्थ अचानक महाग झाले आहेत.
आंध्र प्रदेशला ४० हजार कोटींचा फटका
चक्रीवादळानंतर एकट्या आंध्र प्रदेशाला ४० हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. राष्ट्रीय इस्पात प्रकल्पाचे सुमारे १ हजार कोटी, भारतीय नौदल २ हजार कोटी, आंध्र प्रदेश विद्यापीठ ३०० कोटी, विमानतळाचे ५०० कोटींचे नुकसान झाले.
बुधवारीही सारखीच स्थिती
बिहारमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालेल्या बिहारमधील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. चक्रीवादळामुळे वातावरणात झालेला बदल बुधवारपर्यंत पाहायला मिळेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
मोदींची हवाई पाहणी, हजार कोटींची घोषणा
नैसर्गिक संकटात आम्ही नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहोत, असे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले. टि्वटरवर दिलेल्या संदेशात त्यांनी पीडितांचे सांत्वन केले. मंगळवारी त्यांनी
आपदग्रस्त भागाचा हवाई दौरा केला. हवामान खात्याचे त्यांनी कौतूक केले. संकटग्रस्तांना १ हजार कोटी रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली.
मृतांचा आकडा २६
चक्रीवादळानंतर आंध्रात मृतांचा आकडा २६ वर पोहचला. अजुनही १९१ लोक बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी २७० पाणबुड्यांची मदत घेतली जात आहे. दरम्यान, हुदहुद धडकले त्यावेळी ओडिशात २४५ मुले जन्मली.
बिहारमध्ये पाऊस
आंध्र प्रदेशातील हुदहुद चक्रीवादळामुळे राजस्थान आणि बिहारमध्ये सोमवारी रात्री अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दोन्ही राज्यांतील उष्णतामान काही प्रमाणात कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.