नवी दिल्ली- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'हुदहुद' हे चक्रीवादळाने आज (रविवार) सकाळी 11 वाजेच्या सुमारास विशाखापट्टनम जवळील कैलासगिरीमध्ये दस्तक दिली. काही तासांतच हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनमच्या किनार्यापट्टीला धडकण्याची शक्यता आहे. विशाखापट्टनममध्ये सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसाने दोन जणांचा बळी घेतला आहे.
चक्रीवादळाचा आवाका 40 किलोमीटरपर्यंत पसरला आहे. विशाखापट्टनमच्या किनार्यावर चक्रीवादळ धडकेल तेव्हा त्याचा वेग ताशी 180 किलोमीटर असेल. तसेच समुद्रात 30 मीटर ऊंचीला लाटा उसळू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आंध्र प्रदेश आणि ओडिशात अनेक शहरात ताशी 140 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वार्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. समुद्रात 15 ते 20 फूट ऊंचीच्या लाटा उसळल्या आहेत. त्यामुळे किनार्यावरील लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेश, ओडिशात एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यातील जवळपास दोन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री अधिकार्यांसोबत चर्चा केली.
आपात्कालिन स्थितीत करण्यात आलेल्या उपाययोजनेचाही मोदींनी आढावा घेतला.
तत्पूर्वी वादळाच्या तडाख्याच्या भीतीने आंध्र प्रदेश आणि ओडिशातील सुमारे पाच लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. आठ लाख लोकांना एसएमएस पाठवून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर भुवनेश्वरहून सुटणार्या 40 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने 75 रेल्वेगाड्या रद्द वा त्यांचे मार्ग बदलण्याची तयारी केलेली आहे.
हवामान खात्यानुसार, दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्रच्या किनारपट्टी भागाला वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस होण्याचा धोका आहे. विद्युत पुरवठा ठप्प होऊ शकतो. रेल्वे आणि रस्ते वाहतूकही ठप्प होण्याची भीती आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी वादळ विशाखापट्टणमहून 250, तर ओडिशाच्या गोपालपूरहून 350 किलोमीटरवर होते.