आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Come Yours Door For Begging Girls Narendra Modi

मुलींसाठी तुमच्या दारी पंतप्रधान भिक्षुक होऊन आलाय - नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय अभियानाचा गुरुवारी पानिपतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या वेळी पंतप्रधानांनी जनतेला अत्यंत भावूक शब्दांत आवाहन केले.ते म्हणाले, 'या देशाचा पंतप्रधान आज तुमच्या दारी भिक्षुक म्हणून आला आहे... मुलींच्या चांगल्या जीवनाची भिक्षा मागतो आहे...'

मुलगी झालीच नाही तर सून कुठून आणणार?, मुलींना शिकवताना पन्नास वेळा विचार का करता? म्हातारपणी मुलगाच सांभाळतो, ही धारणाच चुकीची आहे. असे झाले असते तर इतके वृद्धाश्रम उघडलेच नसते, असे मोदी म्हणाले. आज आपण १८ व्या शतकापेक्षा पिछाडीवर आहोत. आपल्याला एकविसाव्या शतकातील नागरिक म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असेही त्यांनी सुनावले. केंद्र सरकारने या अभियानात प्रख्यात अभिनेत्री माधुरी दीक्षितला ब्रँड अम्बेसेडार नेमले असून २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण केवळ ९१९ आहे. मुलींचे प्रमाण कमी असलेल्या १०० जिल्ह्यांत हरियाणातील १२ जिल्हे आहेत.

... हा तर मानसिक आजार
मुलींना राष्ट्रीय सन्मान दिला पाहिजे. तरच आपण मुला-मुलींच्या प्रमाणातील हा असमतोल कमी होऊ शकेल. मुलगा-मुलगी हा भेदभाव करणे म्हणजे मानसिक आजार आहे. त्यातून बाहेर पडा, असे आवाहनही मोदींनी केले. हरियाणातील झज्जर व महेंद्रगड या गावांत हजार मुलांमागे केवळ ७७५ मुली असल्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले, यामुळे २०० मुले मोठेपणी अविवाहितच राहतील.

हुसेन हालींचा उल्लेख
१९व्या शतकातील प्रसिद्ध उर्दू शायर अल्ताफ हुसेन हाली यांचा मोदींनी विशेष उल्लेख केला. मुलींना अर्पण केलेल्या त्यांच्या शायरीतील ओळी मोदींनी वाचून दाखवल्या... "ऐ मां, बहनों, बेटियों दुनिया की जीनत तुमसे है, मुल्को की बस्ती तुम ही, कौमों की इज्जत तुमसे है...'

सुकन्या समृद्धी योजना सुरू
*देशातील १०० जिल्ह्यांत योजना सुरू. हरियाणातील १२ जिल्हे.
*मुला-मुलींच्या प्रमाणात प्रचंड असमतोल असलेले हे १०० जिल्हे आहेत.
*१० वर्षापर्यंतच्या मुलींच्या नावे बँक खाती उघडून प्रारंभ.
*योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १०० कोटींची तरतूद.
*पहिल्या मुलीच्या जन्मानंतर हरियाणात २१ हजार रुपये मिळणार.