आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएएस अजित सक्सेनांची मदत; मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांना घेतात दत्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- विदर्भात २००८मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याला एक मुलगा व तीन मुली होत्या.

मोठी मुलगी नम्रता (१४), सपना (११), स्वाती ७ वर्षांची होती. शिक्षण सुटल्याने त्यांचे भवितव्य अधांतरी होते. पण एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या स्वप्नांना पंख दिले. नम्रता आता नर्सिंगमध्ये डिप्लोमा करून एका रुग्णालयात नोकरी करते. सपनानेही नर्सिंगचेच शिक्षण घेतले आहे. स्वाती बंगळुरूत योग शिक्षणात बीएस्सी करत आहे.

अायएएस अधिकारी अजित सक्सेना यांनी ही किमया घडवून आणली. ते कायम गरीब शेतकरी व त्यांच्या मुलांसाठी झटत आलेले आहेत. अजित यांनी आतापर्यंत विदर्भातील २०० पेक्षा जास्त मुलांना दत्तक घेतले आहे. त्यात बहुतांश मुली आहेत. त्यांचे शिक्षण व पालनपोषणाचा सर्व खर्च अजित हेच उचलतात.

तसेच शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचा संदेशही देतात. आता अजित हे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मोहीम चालवत आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ते निधी गोळा करतात. एका फोन काॅलवर ते मुलांच्या मदतीसाठी धावून येतात. दत्तक घेतलेल्या मुलांचे हालहवाल जाणून घेण्यासाठी ते प्रत्येक महिन्यात वर्धा व जवळपासच्या भागाला भेट देतात. या कामात अनेक मित्रांचीही साथ त्यांना लाभली आहे. अजित सध्या चेन्नईत अतिरिक्त सचिवपदावर कार्यरत आहेत. मुलांसाठी त्यांनी नागपुरात ‘शरणागत फाउंडेशन’ ही संस्था स्थापली आहे. तेथील तीन मुली लातुरात डीटीएड करत आहेत. १० मुली नर्सिंग कोर्स करत आहेत. चार जणी बंगळुरूत योग शिक्षणात बीएससी करत आहेत.

मुलांच्या थेट खात्यात पैसे
अजित यांनी प्रत्येकाचे बँक खाते उघडलेले आहे. त्यात देणगीदार दरमहा पैसे पाठावतात. मुलांना पैसे मिळत आहेत की नाही, मुले ते शिक्षणावर खर्च करत आहेत की नाही, यावर खुद्द अजित यांची नजर असते. त्यांचे एक मित्र १५ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलत आहेत. पाचवीपर्यंत शिकणाऱ्या मुलांना २५० ते ४०० रुपये मिळतात. सहावी ते नववीपर्यंत ६०० रुपये आणि ९ ते १२ पर्यंतच्या मुलांना १००० रुपये मिळतात.