पणजी - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शनिवारी राजीनामा देणार आहेत. मात्र त्याआधीच उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांनी सीएमपदावर दावा ठोकला.
आपण ज्युनियरच्या हाताखाली काम करणार नाही, असे म्हणत राजीनामा देण्याचाही इशारा त्यांनी दिला. डिसुझा हे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा ज्युनियर या अर्थाने संदर्भ देत होते.
अहिर यांची केंद्रात वर्णी : केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी दुपारी एक वाजता विस्तार होईल. यात चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांचा समावेश होईल. त्याबाबत त्यांना पीएमओतून दूरध्वनीही आला. गडकरींनी त्यांना शुक्रवारी दिल्लीत बोलावून अभिनंदन व सत्कारही केला. संपुआ सरकारने केलेला कोळसा घोटाळा उघडकीस आणल्याने खा. अहिर यांना देश ओळखायला लागला. तर भाजपमध्येही त्यांनी या प्रकरणामुळे आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.
हे पद सोडताना मी विचलित आहे. मात्र राज्यापेक्षा राष्ट्र मोठे आहे.
मनोहर पर्रीकर