आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘याद करो कुर्बानी’त जवानांना मानवंदना, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचा अनोखा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - देश-विदेशातील विविध भाषांमधील चित्रपटांचे प्रदर्शन, अनेक उपक्रम तसेच रेड कार्पेटवर सेलिब्रिटींची धूम अशा वातावरणात ४७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्याची राजधानी पणजीत सध्या सुरू आहे. याच महोत्सवात मिरामार समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाने ‘आझादी के सत्तर साल, याद करो कुर्बानी’ नावाने प्रदर्शन सुरू केले आहे.

स्वातंत्र्यकाळापासून आतापर्यंत भारतात प्रदर्शित झालेल्या देशभक्तिपर चित्रपटांचा यात समावेश असून त्या माध्यमातून जवानांना मानवंदना देण्याचा हा प्रयत्न आहे. सुमारे ५०० मीटर क्षेत्रात रस्त्याच्या कडेला पसरलेल्या या प्रदर्शनाला पाहण्यासाठी भारतीय रसिकांसोबतच विदेशातील सिने रसिकसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. भारतीय चित्रपटक्षेत्रातील अनेक दुर्मिळ माहिती या ठिकाणी डिजिटल स्वरूपात ठेवण्यात आली असून त्या अद्ययावत असा बाजही देण्यात आला आहे.

‘उपकार’पासून ‘रंग दे बसंती’पर्यंतचा प्रवास : या प्रदर्शनाची विभागणी तीन विभागांत करण्यात आली असून पहिल्या विभागामध्ये भारतीय चित्रपट क्षेत्रामध्ये देशभक्ती या विषयावर प्रदर्शित झालेल्या जवळपास सर्व चित्रपटांचे पोस्टर लावले आहेत. यात बॉलीवूडमधील महान चित्रपटांपैकी एक उपकार, क्रांती, बॉर्डर, तिरंगा, लगान, रंग दे बसंती ते एलओसीपर्यंतच्या विविध चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी या चित्रपटांच्या निर्मितीमागील रंजक बाबीही सांगितल्या जात आहेत.

प्रदर्शनात दुर्मिळ व्हिडिओंचा संग्रह
भारतीय चित्रपट क्षेत्राच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ मानले जाणारे व्हिडिओसुद्धा या प्रदर्शनात राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाने रसिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यात देशभक्तिपर गाणी, महापुरुषांची भाषणे, लष्कराशी संबंधित गौरवशाली तथ्यांचा यात समावेश आहे. शिवाय, ऑडिओ रूपात देशभक्तिपर गाणीही उपलब्ध करण्यात आली असून त्यामध्ये मोहंमद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, एस. पी. बालसुब्रमण्यम अशा अनेक गायकांची अजरामर गीतेही रसिकांना ऐकण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.
बातम्या आणखी आहेत...