आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणाचा स्तर घसरला, आता मी सक्रिय नसेन : मांजरेकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - चांगल्या हेतूने प्रेरित होऊन आपण राजकारणाची कास धरली होती. मात्र, राजकारणाचा स्तर सध्या खूपच घसरला आहे. त्यामुळे आगामी काळात मी राजकारणात सक्रिय राहणार नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढवणारे उमेदवार तसेच अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे. ४७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) निमित्ताने त्यांनी पणजीमध्ये ‘दैनिक दिव्य मराठी’शी संवाद साधला.

- आधी तुम्ही राजकारणात खूप सक्रिय होता. आता दिसत नाहीत?
मांजरेकर- मी राजकारणात जनतेच्या भल्यासाठी आलो होतो. परंतु, सध्याच्या काळात राजकारणाचा स्तर खूप घसरला आहे आणि मी त्या स्तराला जाऊन राजकारण करू शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मी उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभा निवडणूक दुर्दैवाने हरलो. मात्र, आता यापुढे राजकारणात राहायचे नाही, असे मी ठरवले आहे.

- मनसेही सोडणार काय? पक्षाच्या सद्य:स्थितीबाबत काय मत?
मांजरेकर- नाही. मी कायमच मनसेसोबत राहीन. फक्त प्रत्यक्ष राजकारणात दिसणार नाही. सध्या मनसेची स्थिती खालावली असली तरी त्यात वावगे असे काही नाही. प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. मनसेलाही चांगले दिवस नक्की येतील.

- नोटबंदीच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटते?
मांजरेकर- पंतप्रधानांनी घेतलेला हा निर्णय चांगला आहे. मात्र, विरोधक नेमका का विरोध करत आहेत. हे मला अजिबातच कळत नाहीये. ज्या सामान्य नागरिकांना या निर्णयामुळे त्रासाची नाहक झळ पोहोचत आहे, ते तर चुपचाप सहन करत आहेत. केवळ राजकारण किंवा अन्य क्षेत्रच नव्हे तर चित्रपट क्षेत्रातीलही बऱ्याच गोष्टींवर नोटबंदीच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.

- चित्रपटांच्या बाबतीत काय योजना आहे?
मांजरेकर- पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत माझे चार चित्रपट प्रदर्शित होतील. यातील एका चित्रपटात ‘सैराट’चा नायक परश्या ऊर्फ आकाश ठोसर, दुसऱ्यात गश्मीर महाजनी आणि तिसऱ्या चित्रपटामध्ये मी स्वत: अश्विनी भावेसाेबत झळकणार आहे, तर चौथ्या चित्रपटावर अद्याप काम सुरू आहे.

‘नटसम्राट’च्या यशाने समाधानी
‘नटसम्राट’ला महाराष्ट्रातील रसिकांनी भरभरून दाद दिली. सध्याही इफ्फीमध्ये हा चित्रपट धूम करत आहे. रसिकांना हा चित्रपट आवडेल, हे मी आधीच जाणून होतो. मात्र, कमाईच्या बाबतीत हा चित्रपट ५० कोटींच्या घरात पोहोचेल असे वाटले नाही, अशी प्रतिक्रियाही महेश मांजरेकरांनी इफ्फीच्या रेड कार्पेटवरून दिली.
बातम्या आणखी आहेत...