आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘शोले’ सारखी कलाकृती पुन्हा होणे नाही : रमेश सिप्पी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - ‘शोले’ ही भारतीय चित्रपट क्षेत्रातील अजरामर कलाकृती आहे. त्या काळी त्याने मिळवलेली लोकप्रियता, प्रेक्षकांनी दिलेला अप्रतिम प्रतिसाद हे अगदी स्वप्नवतच आहे. अशा प्रकारची कलाकृती सध्याच्या काळात पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत ‘शोले’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी त्यांच्या भावना ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केल्या. ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तब्बल ४० वर्षांपासून ‘शोले’ची लोकप्रियता कायमच आहे, तुम्हाला कसे वाटते?
सिप्पी- अर्थातच “शोले’चा दिग्दर्शक या नात्याने ही गोष्ट माझ्यासाठी गौरवशाली आहेच. मात्र, १९७५ मध्ये निर्मितीवेळी हा चित्रपट या क्षेत्रातील महान कलाकृती बनेल, असे काहीच वाटले नव्हते. मी तर केवळ चित्रपट बनवला होता. प्रेक्षकांनी त्याला अगदी डोक्यावर घेऊन एका वैभवशाली उंचीवर नेऊन ठेवले.

चित्रपटांतील अश्लीलता, हिंसाचार याबद्दल काय वाटते?
सिप्पी- सध्याची तरुणाई ही बॉलीवूडपटांचा खरा प्रेक्षकवर्ग आहे. त्यांच्यात आक्रमकता आहे, बिनधास्तपणा आहे. त्यामुळे या तरुणाईमध्ये अशा विषयांची मागणी असते आणि मागणीनुसार पुरवठा हा सृष्टीचा नियम आहे. दिग्दर्शक, निर्मातेही मग याच नियमाला धरून चित्रपटांची निर्मिती करतात.

सध्या बऱ्याच चित्रपटांचे रिमेक होत आहेत. ‘शोले’चा का नाही?
सिप्पी-रिमेक हे चित्रपटाचे पुनरुज्जीवन असते आणि ते विस्मृतीत गेलेल्यांसाठी असावे. ‘शाेले’ किमान शतकभर तरी विस्मृतीत जाणे शक्य नाही. मात्र, “शोले’च्या रिमेकची सध्या तरी काहीच योजना नाही. रिमेक झाला तरी तशी कलाकृती पुन्हा जन्माला येणार नाही हे नक्की. शिवाय, ज्या प्रेक्षकांनी शोले जगलाय ते आता पुन्हा मिळणे शक्य नाही. आताच्या प्रेक्षकांची मागणी, अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. त्यांना तो रुचेलच असेही नाही.

तुम्ही आता पूर्वीसारखे सक्रिय नाहीत. काय कारण?
सिप्पी- मी सक्रिय आहे. अजूनही नवनव्या विषयांच्या, पात्रांच्या शोधात असतो. लवकरच माझा एक चित्रपट येणार आहे. त्याबाबतीत आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही. चित्रीकरण जवळपास झाले असून पुढच्या वर्षीपर्यंत त्याचे प्रदर्शन होऊ शकते. याशिवाय अजून काही नवीन मी करत नाही.
बातम्या आणखी आहेत...