आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये शिक्षणमंत्र्यांच्या घरावर पेट्रोलबाॅम्ब फेकला, तणाव कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरमधील अस्थिरता अद्यापही कायम असून राज्याचे शिक्षणमंत्री नईम अख्तर यांच्या निवासस्थानावर एका अज्ञात हल्लेखोराने पेट्रोलबाॅम्बने हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. सुदैवाने त्यात प्राणहानी झाली नाही. परायपोरा भागात अख्तर यांचे घर आहे. हल्ल्यात घराचे मुख्य प्रवेशद्वाराचे नुकसान झाले. हल्ला झाला त्या वेळी अख्तर व त्यांची पत्नी घरात नव्हते.
गेल्या वर्षी पीडीपी-भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना गुपकर मार्गावरील निवासस्थान देण्यात आले आहे. तेथे त्यांना कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे. दुसरीकडे राज्यातील काही भागांत अजूनही संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. काही भागातील संचारबंदी उठवण्यात आली आहे. फुटीरवाद्यांनी बंद काही वेळासाठी मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर बाजारपेठेतील तुरळक दुकाने सुरू झाल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले, परंतु एकूणच बाजारपेठेतील शुकशुकाट कायम दिसून आला. नोवहाटा, खानयार, रैनवारी, सफागादल, बातामालू, महाराजगंज या भागात संचारबंदी लागू आहे.

निदर्शने सुरूच
फुटीरवाद्यांनी मंगळवारीही निदर्शने सुरूच ठेवली होती. ८ जुलैच्या चकमकीत मुजाहिदीन कमांडर बुरहान वानीला ठार केल्याच्या निषेधार्थ फुटीरवादी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. चकमकीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या हिंसाचारात ४९ जणांचा मृत्यू झाला होता. सुमारे ५६०० लोक जखमी झाले होते. हिंसाचार वाढू नये यासाठी काही भागांत मोबाइल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. फुटीरवाद्यांनी ५ ऑगस्टपर्यंत बंद वाढवला आहे.

काश्मीरवर लक्ष ठेवून : बान
संयुक्त राष्ट्रे । भारत व पाकिस्तानने विधायक पद्धतीने प्रश्न सोडवला पाहिजे. यासाठी आम्ही काश्मीरवर लक्ष ठेवून आहोत, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नियंत्रण राखणाऱ्या गटाकडून उभय देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आहे, असे बान यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते फरहान हक यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यातही बान यांनी काश्मीरमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. पाक भारताला बदनाम करू पाहत आहे.
बातम्या आणखी आहेत...