आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेरर फंडिंग; एनआयएच्‍या छापसत्रात पहिल्या दिवशीच 2.20 कोटी रुपये जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी राष्ट्रीय तपास संस्थेचा (एनआयए) आणखी आठ, तर दिल्ली-एनसीआरमध्ये दोन ठिकाणी छाप्याची कारवाई केली. त्यात डझनावर फुटीरवादी नेत्यांना अटक झाली आहे. एनआयएने बुधवारी २७ ठिकाणी टाकलेल्या छाप्यातून सुमारे २.२० कोटी रुपये जप्त केले होते. कारवाईच्या कक्षेत अनेक व्यापारीदेखील आले आहेत.  

एनआयएने दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचा धडाका सुरू असून गुरुवारी जम्मू-काश्मीर, दिल्लीजवळील एनसीआरसह अन्य दहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक पुरवठ्यावर टाच आणण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारवाईत फुटीरवादी शब्बीर शहाच्या साथीदाराकडून काही शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या कारवाईचा वेग वाढवला आहे. खोऱ्यासह दिल्ली, गुडगाव येथील १० ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. त्यात पाकिस्तानवादी जीएन सुमजी या नेत्याच्या वडिलोपार्जित निवासस्थानी छापा टाकण्यात आला. एनआयएने दक्षिण काश्मीर भागात आपली कारवाई केली. दक्षिण काश्मीर हा दहशतवाद्यांचा अड्डाच मानला जातो. या अड्ड्यात घुसून एनआयएने दहशतवादी कारवायांना फूस लावणाऱ्या व्यक्तींची पाळेमुळे खणण्यास सुुरुवात केली आहे. शिया नेते व फुटीरवादी अगा सईद हुसेन बदगामी याच्या घरावरदेखील छाप्याची कारवाई केली. तो हुरियत कॉन्फरन्स नेता सय्यद अली शहा गिलानीचादेखील निकटवर्तीय मानला जातो. दिल्ली व गुडगाव येथील काही अकाउंटंट्स यांच्यावरदेखील एनआयएने कारवाई केली. दिल्लीतील उद्योजक झहूर वाटाली यांच्यासाठी हे अकाउंटंट्स काम करत होते. पैसा पुरवठा करणाऱ्यांच्या यादीत संशयित म्हणून झहूर वाटाली यांचाही समावेश आहे.  
 
पिस्तूल, बंदूक जप्त  
फुटीरवादी शब्बीर शहाचा साथीदार अब्दुल रझ्झाकच्या घरावरही एनआयएने छापा टाकला. त्याच्या घरातून एक पिस्तूल, बंदूक आणि रायफल जप्त करण्यात आली आहे. आपण परवानाधारक असून त्यासंबंधीची कागदपत्रे सादर करण्याची तयारीदेखील रझ्झाकने तपास अधिकाऱ्यांसमोर दर्शवली. 
 
९ सप्टेंबर रोजी कोर्ट अरेस्टची घोषणा  
फुटीरवादी नेत्यांनी दिल्ली येथील एनआयएच्या मुख्यालयात ९ सप्टेंबर रोजी कोर्ट अरेस्टची घोषणा केली होती. त्यानंतर हुरियतच्या नेत्यांच्या घरांवर एनआयएने कारवाई केल्याचे सांगण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...