आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूच्या मंत्र्यासह तीन जणांना समन्स; प्राप्तिकरच्या चौकशीला आज हजर राहण्याचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- प्राप्तिकर विभागाने तामिळनाडूचे आरोग्यमंत्री विजयभास्कर, अभिनेता आणि राजकीय नेता शरदकुमार तसेच तामिळनाडूतील डॉ. एम. जी. आर. वैद्यकीय विद्यापीठाच्या कुलगुरू गीतालक्ष्मी यांना समन्स पाठवले आहे. प्राप्तिकर बुडवल्याच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी त्यांना सोमवारी बोलावण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या सर्वांच्या बंगल्यांसह परिसरांवर ७ एप्रिलला प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते.
 
आरोग्यमंत्री विजयभास्कर यांनी सांगितले की, मला समन्स मिळाले आहे. मी कायद्याचा मान राखणारा आहे. त्यामुळे मी प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात सोमवारी सकाळी उपस्थित राहीन. मी चौकशीला संपूर्ण सहकार्य करेन. विजयभास्कर यांचे वडील चिन्नाथंबी आणि त्यांचे एक नातेवाईक तिरुचिरापल्ली येथील विभागाच्या कार्यालयात उपस्थित झाले होते.  

प्राप्तिकर विभाग आणि सुरक्षा विभागाच्या १०० कर्मचाऱ्यांच्या पथकाने विजयभास्कर आणि शरदकुमार यांच्या चेन्नईतील बंगल्यांसह राज्यातील ३० ठिकाणी ७ एप्रिलला छापे टाकले होते. विजयभास्कर यांच्या एका सहकाऱ्याने आर. के. नगर विधानसभा मतदारसंघात मतदारांना वाटण्यासाठी ८९ कोटी रुपये वळवल्याचे या छाप्यांच्या वेळी उघड झाले होते. या मतदारसंघात १२ एप्रिलला मतदान होत आहे. 
 
विजयभास्कर हे अद्रमुकच्या अम्मा गटाचे आर. के. नगर मतदारसंघातील उमेदवार टी. टी. व्ही. दिनकरन यांचे निष्ठावंत आहेत. त्यांच्याकडे या मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी आहे. प्राप्तिकर विभागाचा छापा पडणारे ते राज्याचे पहिलेच मंत्री आहेत. 
बातम्या आणखी आहेत...