दार्जिलिंग - पश्चिम बंगालमधील हिंसाचार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्यामुळे गुरुवारी पाेलिस व स्वतंत्र गोरखा प्रदेशाची मागणी करणाऱ्या गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या निदर्शकांतील धुमश्चक्री सुरू होती. गोरखालँडच्या मागणीसाठी निदर्शने सुरू आहेत. गुरुवारी संघटनेचा प्रमुख बिमल गुरुंगसह अन्य नेत्यांच्या निवासस्थानावर छाप्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या जीजेएमच्या समर्थकांनी एका पोलिस ठाण्याला पेटवून दिले. त्यामुळे प्रदेशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दार्जिलिंगमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. दररोज गोरखालँडच्या मागणीसाठी आंदोलन व हिंसाचार पाहायला मिळू लागला आहे. खरे तर दार्जिलिंगमध्ये सध्या पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हंगाम सुरू आहे. परंतु राजकीय संकट निर्माण झाल्यामुळे येथील तरुण बेरोजगार बनला आहे. सध्याची परिस्थिती राज्य सरकारने तयार केली आहे. या भागात पोलिसांचा फौजफाटा तैनात करून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करू लागले आहे, असा आरोप जीजेएमचे सरचिटणीस रोशन गिरी यांनी केला आहे. ते गुरुवारी वृत्तसंस्थेशी बोलत होते. केंद्र सरकारने आणखी ६०० निमलष्करी सैनिकांना पाठवले आहे. राज्य सरकारने हा राजकीय प्रश्न तातडीने सोडवण्याची वेळी आहे, असा इशारा गिरी यांनी दिला. दार्जिलिंगमध्ये मोठ्या प्रमाणात चहाचा उद्योग व मळे आहेत.
शस्त्रांचा साठा जप्त, छाप्यांची कारवाई, बंद वाढवल्याचे जाहीर
गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग यांच्या निवासस्थानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटके व शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. ३०० शस्त्रे जप्त केली. त्यात स्फोटके, बाणांचा समावेश होता. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. सिंगमारी, पटलबास या भागात छापेसत्र सुरू आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर भडकलेल्या फुटीरवादी गोरखालँड संघटनेने दार्जिलिंगमध्ये गुरुवारपासून अनिश्चित काळासाठी बंद पाळण्यात येईल, असे जाहीर केले. राज्य सरकार या विषयात राजकारण करू लागले आहे. पोलिसांनीदेखील हे आंदोलन चिरडण्याचे सर्व प्रयत्न केल्याचा आरोप गुरुंग यांनी केला आहे.
सकाळीच दगडफेक
दार्जिलिंगमध्ये गुरुवारी सकाळी धुके पसरलेले होते. त्याचा फायदा घेऊन एका निमलष्करी दलाच्या सैनिकांवर लांबून कोणी तरी दगडफेक केली. बाजूला एका कारला पेटवून देण्यात आले होते. दगडफेक करणारा गोरखालँडचा कार्यकर्ता होता किंवा नाही, हे मात्र सांगता येणार नाही.
बंगालीच्या सक्तीला विरोध
दार्जिलिंगमध्ये गोरखा समुदायाची संख्या सर्वाधिक आहे. त्यांची भाषा नेपाळी आहे. राज्य सरकारने बंगाली भाषा त्यांच्यासाठी अनिवार्य केली आहे. त्याला गोरखालँड संघटनेने विरोध दर्शवला आहे.