आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Constructing Longest Bridge In Arunachal Pradesh

ईशान्येत ब्रह्मपुत्रा नदीवर तयार होतोय देशातील सर्वात लांब पूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटानगर - आसाममधील बोगीबिल येथे ब्रह्मपुत्रा नदीवर भारतातील सर्वात लांबीचा पूल बांधण्यात येत असून हा पूल ईशान्य भारतासाठी जीवनरेखा तर ठरणार आहेच, शिवाय त्यामुळे देशाची सुरक्षाही आणखी भक्कम होणार आहे.
रेल्वे आणि रस्ते वाहतूक अशा दुहेरी उद्देशाने या पुलाची उभारणी करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट 1985 रोजी केंद्र सरकार आणि ईशान्येतील राज्यातील बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध दशकभराहून अधिक काळ संघर्ष करणा-या आसाम विद्यार्थी संघटना आणि असाम गण संग्राम परिषदेमध्ये झालेल्या आसाम करारांतर्गत ईशान्य सीमावर्ती रेल्वे हा पूल उभारत आहे. या पुलामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण आणि उत्तर किना-यावरील रेल्वेमार्गाशी रेल्वेचे जाळे जोडले जाणार आहे.

पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार 2002 मध्ये सुरू झालेले पुलाचे बांधकाम सहा वर्षांत पूर्ण करायचे होते, परंतु निधीचा अभाव आणि दुर्लक्षामुळे 2007 मध्ये राष्ट्रीय दर्जा मिळेपर्यंत बांधकाम सुरू होऊ शकले नाही. राष्ट्रीय दर्जा म्हणजे या पुलासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय 75 टक्के निधी देणार आहे, तर 25 टक्के निधी रेल्वे उभा करणार आहे. ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किना-यापासून अरुणाचल प्रदेशाची सीमा 20 किलोमीटर अंतरावर आहे.


...आणि नाराजीही
ब्रह्मपुत्रा नदीच्या या काठावरून त्या काठावर लोकांची ने-आण करण्यासाठी दररोज 100 बोटी चालतात. मात्र एकदा पूल पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधनच बंद होण्याच्या भीतीने शंभर नावाड्यांच्या कुटुंबाची झोप उडाली आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून त्यांचे उत्पन्नाचे हेच एकमेव साधन आहे.


दीड तासाचे अंतर मिनिटांवर
सध्या ब्रह्मपुत्रा नदी ओलांडण्यासाठी दीड तासाहून अधिक वेळ लागतो. या पुलामुळे मात्र काही मिनिटांमध्ये नदी ओलांडणे शक्य होणार आहे. मालवाहतुकही सोयीची होणार आहे.


अनंत अडचणी
प्रकल्पासाठी निधीच्या चणचणीबरोबच रेल्वेला अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिब्रुगडमध्ये वर्षातील आठ महिने पाऊस पडतो. त्यामुळे या काळात ब्रह्मपुत्रा नदीवर कोणतेही बांधकाम करणे हे मोठेच आव्हान आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते मार्च असे चारच महिने कामासाठी मिळतात, असे या प्रकल्पाचे अभियंते अजित पंडित यांनी सांगितले.


लष्करीदृष्ट्या उपयुक्त
बहुउद्देशीय पुलामुळे अपर आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील दळणवळण सुकर होणार आहे. चीन सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ दहा तासांनी कमी होणार आहे. परिणामी आणीबाणीच्या परिस्थितीत लष्करी सामग्री पोहोचवणे सोपे जाणार आहे.