आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Developed Independent Global Positioning System, News In Marathi

लवकरच कार्यरत होणार भारताची स्वतंत्र ग्लोबल पोझिशनिंग प्रणाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - इस्त्रो या वर्षी आणखी काही उपग्रहांच्या प्रक्षेपणाची तयारी करत आहे. यात आयआरएनएसएस १-डीचा समावेश असून यामुळे भारत स्वत:ची दिशासूचक प्रणाली सुरू करू शकणार असून ती अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या बरोबरीची असेल.

इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयआरएनएसएस १-डीचे प्रक्षेपण अभियान १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन महिन्यांच्या आत इस्रोच्या इतर प्रयोगशाळांमधील सर्व उपकरणे श्रीहरिकोटाला घेऊन जाण्याचे कठीण आव्हान आहे. १५ मार्चनंतर या उपग्रहाचे प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे.

मालिकेतील चौथा सॅटेलाइट
राष्ट्रीय अंतराळ संस्थेने (इस्रो) अंतराळात आयआरएनएसएस १-डी मालिकेत एकूण सात उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आखली आहे. त्या मालिकेतील हा चौथा उपग्रह आहे. यामुळे इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम (आयआरएनएसएस) सुरू केली जाऊ शकेल. ही प्रणाली सुरू करण्यासाठी चार उपग्रह पुरेसे आहेत, परंतु त्यात अचूकता आणण्यासाठी व ती कार्यक्षम करण्यासाठी भारत आणखी तीन उपग्रह सोडणार आहे.

निवडक देशांकडेच प्रणाली
सध्या जगातील काही देशांकडेच दिशासूचक प्रणाली आहे. यात रशियाची ग्लोनास, अमेरिकेची जीपीएस, युरोपीय संघाच्या जीएनएसएस, चीनच्या बेईदोऊ यांचा समावेश आहे. लवकरच त्यात भारताच्या आयआरएनएसएसचा समावेश होईल.

या वर्षी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
आयआरएनएसएस मालिकेअंतर्गत आणखी दोन उपग्रह आयआरएनएसएस १-ई व आयआरएनएसएस१-एफ यांचे प्रक्षेपणही याच वर्षी पूर्ण करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे. आधीच्या तीन उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून १ जुलै २०१३ तसेच चार जुलै, १६ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आले होते. आयआरएनएसएसच्या भूस्तरीय कक्षेत तीन व चार उपग्रह समाविष्ट असतील. हे उपग्रह पृथ्वीच्या ३६,००० किलोमीटरवर कक्षेत स्थापित असतील. आयआरएनएसएस प्रणाली या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून या योजनेवर १,४२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.