आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाने पाहिली मोदी-नितीशांची दोन रूपे, आधी टाळी, मग टीकास्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू. एकमेकांचा राजकीय पाणउतारा करण्याची एकही संधी ते कधी सोडत नाहीत. परंतु कट्टर राजकीय शत्रूचा विरोध स्थळकाळपरत्वे कसा गळून पडतो आणि कसा उफाळून येतो याची दोन रूपे शनिवारी एकाच दिवशी देशाला पाहायला मिळाली. पाटण्यात रेल्वे प्रकल्प, पशुवैद्यकीय महाविद्यालय व आयआयटी पाटणाच्या उद््घाटनप्रसंगी एका मंचावर असताना मोदी-नितीशकुमार एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारताना दिसले. तेथील भाषणात त्यांच्या भाषणातील टीकेतही गोडवा होता. परंतु त्यानंतर काही तासांतच मंच बदलला. मोदींनी रालोआच्या बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडताना नितीशकुमारांवर कडवट टीका केली. नितीशकुमारांनीही त्या टीकेचा तेवढ्याच कडवटपणे समाचार घेतला.

दोन प्रसंगांचे दोन रंग
एका मंचावर समदु:खाची भावना, टीकेत गोडवा

नितीशकुमार : मोदी यांना माझी वैयक्तिक विनंती आहे. दरियाबा-बिहार शरीफ रेल्वे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. २००४ मध्ये केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार असताना सहा महिने आधीच निवडणुका घेण्याचा निर्णय झाला नसता तर ताे २००४ मध्येच सुरू झाला असता.

नरेंद्र मोदी : नितीशकुमारांशी मी सहमत आहे. वाजपेयी सरकारच्या काळात हे काम सुरू झाले असते तर ते आजवर पूर्ण झाले असते. वाजपेयी सत्तेत असते तर हा रेल्वे प्रकल्प पूर्णही झाला असता. नितीशकुमारांचे दु:ख मी समजू शकतो. राजकारणामुळे बिहार मागे राहिला.

मंचावरून पाठ फिरताच कडवट टीका
मोदी : राजकारणात मतभेद असू शकतात. पण तुम्ही बिहारचे काय करून ठेवले ? मी वाईट होतो तर खोलीत येऊन थापड मारायची होती, गळा घोटायचा होता. पण तुम्ही बिहारच्या विकासाचा गळा का घोटला? नितीश जंगलराज चालवत आहेत. त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला की नाही? विश्वासघात केला की नाही? ( मुझफ्फरपुरात रालोआच्या प्रचार सभेत)

नितीश : गेल्या वर्षी तुम्ही बिहारला विशेष दर्जा, विशेष लक्ष व विशेष पॅकेजचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? तुम्हाला बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा अतिरिक्त पदभार हवा आहे का? (जुन्या भाषणाची क्लिप दाखवली. ) अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि यशवंत सिन्हांचे काय झाले हे आधी सांगा, मग फर्नांडिसांचे बोला. (मोदींच्या सभेनंतर पाटण्यात पत्रकार परिषदेत)

घरोबा ते दुरावा : बिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमार यांच्या जदयूची युती होती. जदयू रालोआचा घटक पक्ष होता. नितीश हे आधीपासूनच मोदींचे टीकाकार होते. त्यामुळे २०१३ मध्ये भाजपने मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर नितीशकुमारांनी युती तोडून टाकली.