आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Milestone As It Launches Own Aircraft Carrier INS Vikrant

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रांतचे जलावतरण होताच चीनच्या कपाळावर आठ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची - संपूर्ण भारतीय बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे सोमवारी थाटात जलावतरण झाले आणि मोठा आकार व क्षमतेच्या युद्धनौकांची आखणी आणि बांधणी करण्याची क्षमता असलेल्या जगातील मोजक्याच देशांच्या पंक्तीत भारत विराजमान झाला आहे. आयएनएस विक्रांतचे जलावतरण होताच चीनच्या कपाळावर मात्र आठ्या आल्या आहेत.

संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांच्या पत्नी एलिझाबेथ यांच्या हस्ते कोची शिपयार्डमध्ये 37500 टन वजनाच्या आयएनएस विक्रांतचे जलावतरण करण्यात आले. साडेचार वर्षांपूर्वी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विक्रांतच्या पोलादी कण्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता. नौदल संरचना संचालनालयाने या युद्धनौकेचा आराखडा तयार केला आहे, तर स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने तयार केलेले उच्च प्रतिचे पोलाद त्यासाठी वापरण्यात आले आहे.

युद्धनौकांची आखणी आणि बांधणीची क्षमता देशाने प्राप्त केली आहे. हा देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणारा आणि देशवासीयांची छाती अभिमानाने फुगवणारा क्षण आहे. युद्धनौकांच्या बांधणीच्या प्रदीर्घ प्रवासातील ही महत्त्वाची पहिली पायरी आहे, असे अँटोनी यांनी सांगितले. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया या चारच देशांकडे अशा क्षमतेच्या विमानवाहू युद्धनौका बांधणीची क्षमता आहे. 2018 अखेर दोन मोठ्या युद्धनौका असलेला भारत हा आशियातील एकमेव देश ठरणार आहे.

2018 मध्ये नौदलात
260 मीटर लांबी आणि 60 मीटर रुंदीच्या आयएनएस विक्रांतचे जलावतरण तब्बल तीन वर्षे उशिराने झाले आहे. 2016 पर्यंत विक्रांतच्या खडतर चाचण्या घेण्यात येणार असून 2018 अखेरपर्यंत ती नौदलात सामील करण्यात येणार आहे.

ही विमाने असतील तैनात
आयएनएस विक्रांतवर मिग- 29 के, हलक्या वजनाची लढाऊ विमाने कामोव- 31 हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणालीनेही विक्रांत सज्ज राहणार आहे.

मोठी युद्धनौका बांधणार
देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यासाठी किमान दोन विमानवाहू युद्धनौका असाव्यात, अशी भारताची योजना आहे. त्यामुळे सोमवारी जलावतरण झालेल्या आयएनएस विक्रांतपेक्षाही मोठ्या आकाराची युद्धनौका बांधण्याची देशाची योजना आहे. सध्या देशाकडे आयएनएस विराट ही एकमेव युद्धनौका असून 2018- 19 मध्ये विक्रांत नौदलात दाखल झाल्यानंतर ती काढून टाकण्यात येणार आहे.

नाव जुनेच, नौका नवी
परदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत 1997 मध्ये नौदलातून काढून टाकण्यात आली. पाकिस्तानशी 1971 मध्ये झालेल्या युद्धात आयएनएस विक्रांतने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्याच नावाने संपूर्ण देशी बनावटीची युद्धनौका विकसित करण्यात आली आहे.

भारत हे नवे ‘शिप हब’
आर्थिक मंदीमुळे जहाज बांधणी उद्योग संकटात असला तरी या क्षेत्रात विकसनशील देशांचे भारत हे नवे ‘शिप हब’ असेल. भक्कम जहाज बांधणी उद्योग हा कोणत्याही सक्षम अर्थव्यवस्थेचा कणा असतो, असे जहाज बांधणी मंत्री जी. के. वासन यांनी सांगितले.

आशिया खंडात स्पर्धा वाढणार नाही : चीन
नव्या युद्धनौकेमुळे रशियासारख्या शस्त्रास्त्र विक्रेत्याशी भारत घासाघीस करेल, असे बीजिंगमधील लष्करी उपकरणे संशोधक वांग डागाँग यांनी म्हटले आहे. विक्रांतमध्ये 1980 चे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा भारतीय नौदलाचा प्रायोगिक उपक्रम आहे, असे विश्लेषक साँग शियाजून यांनी म्हटले आहे. आशियात स्पर्धा वाढणार नसल्याचे ज्येष्ठ कॅप्टन झांग जुनशी यांनी म्हटले आहे.