आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूंछमधील चार चौक्या, गावांवर पाकिस्तानी लष्कराचा तोफहल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/जम्मू - सर्जिकल स्ट्राइकमुळे खवळलेले दहशतवादी आणि पाकिस्तानी सुरक्षा दले आता एकत्रितपणे भारतीय लष्कर आणि नागरिकांना लक्ष्य करत आहेत. बारामुल्लात रविवारी रात्री दहशतवादी हल्ला अपयशी ठरल्यानंतर सोमवारी सकाळी पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानने तोफहल्ला केला. १२० मिमी, ८० मिमी माॅर्टर तोफगोळे डागले तसेच स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी गोळीबार केला. या हल्ल्यात दोन महिलांसह ५ नागरिक जखमी झाले आहे. त्यामुळे या भागात दहशत आहे. संपूर्ण सीमा भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय सुरक्षा दलांनीही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानने सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता शाहपूर सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केला. चौक्यांसोबतच गावांनाही लक्ष्य करण्यात आले. दुपारी पावणेदोन वाजता साबिजया क्षेत्रात तोफहल्ला केला. तेथे दहशतीमुळे ग्रामस्थ घर सोडून खुल्ला मैदानात आले. तेथे लष्कराच्या चौकीत रॉकेलमध्ये तोफगोळा पडल्याने आग लागली. गगडिया गावात काही दुकानांचे नुकसान झाले. कृष्णाघाटी आणि मंडी क्षेत्रातही पाकिस्तानने हल्ला केला.

२८ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने पाच दिवसांत १० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मात्र, भारतानेही नेजा पीर आणि इफ्तिखारबंद क्षेत्रात गोळीबार केला, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. दरम्यान, अखनूर, पल्लनवाला आणि छांब सेक्टरच्या सीमावर्ती ४५ गावांतील सुमारे ५० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत.

‘भारत सिंधू करारप्रश्नी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही’
इस्लामाबाद : भारताच्या आक्रमक धोरणामुळे घाबरलेले पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सोमवारी देशातील सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर सर्वांनी एकसुरात म्हटले की, भारत सिंधू पाणी वाटप कराराप्रकरणी एकतर्फे निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे विभागीय शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण होईल. बैठकीत सर्व राजकीय पक्ष सहभागी झाले. मात्र, इम्रान खान उपस्थित नव्हते.
रात्रभर घेराव घालूनही दहशतवादी पळाले, मृतदेह मिळाला नाही
बारामुल्लात लष्कर व बीएसएफच्या शिबिरावर रविवारी रात्री हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना सोमवारीही पकडता आले नाही. ज्या दोन दहशतवाद्यांना मारल्याचा दावा करण्यात आला होत, त्यांचे मृतदेहही मिळाले नाहीत. सोमवारी शोध मोहीम सुरू होती. रात्रभर घेराव घातल्यानंतरही दहशतवादी स्थानिक लोकांच्या मदतीने पळून गेले, अशी शक्यता सुरक्षा दलांनी व्यक्त केली. बीएसएफचे आयजी विकास चंद्रा यांनी सांगितले की, हल्ल्यात दोन दहशतवादी सहभागी होते.
बातम्या आणखी आहेत...