आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारला नाहीत तर पुन्हा सर्जिकल स्ट्राइकसाठी तयार राहा; भारताची पाकला तंबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उधमपूर (जम्मू-काश्मीर) - सैन्याच्या उत्तर जनरल ऑफिसर इन कमांडचे (जीआेसी) लेफ्टनंट जनरल देवराज अन्बू यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे. वेळीच सुधारला नाहीत तर पुन्हा सर्जिकल स्ट्राइकसाठी तयार राहा, असे अन्बू यांनी सुनावले. पाकिस्तानकडून  दहशतवादी घुसखोरी आणि सीमेवर गोळीबाराचे प्रकार वाढत आहेत. यात घट झाली नाही तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. देवराज यांनी म्हटले की, ‘सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट केले की नियंत्रण रेषा पार करणे आमच्यासाठी अशक्य नाही. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही तिला पार करू. गरज पडलीच तर आम्ही ती आेलांडूनही जाण्यास कचरणार नाहीत.’ दहशतवादाला निधी देण्यासंबंधी एनआयएच्या कारवाईवर ते म्हणाले की, खोऱ्यात दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत. नियंत्रण रेषेजवळील परिसरात दहशतवादी लाँच पॅड आणि अड्ड्यांमध्ये गेल्या वर्षभरात वाढ झाली आहे. त्यांनी म्हटले की, पीर पंजालच्या दक्षिण आणि उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात दहशतवादी स्थानके आणि लाँच पॅड आहेत. त्यांच्या संख्येत घट झालेली नाही.  

जीआेसीने सांगितले की, गेल्या वर्षी सप्टेंबरात नियंत्रण रेषा पार करून सर्जिकल स्ट्राइक तडीस नेला. ही मोहीम राबविणाऱ्या ८ सैनिकांना गुरुवारी उत्तर कमांडने शौर्यचक्र आणि सेना मेडल बहाल केले. नियंत्रण रेषेपलीकडील परिस्थितीवर त्यांनी म्हटले की, काश्मीर खोरे आणि जम्मूमध्ये घुसखोरीचे प्रयत्न झाले. मात्र यातील बहुतांश प्रयत्न निष्फळ ठरले.  
 
लष्करप्रमुख रावत यांच्या विधानाने चीन संभ्रमात; नाराजी दर्शवली
चीनने भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या सलामी स्लायसिंगच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. चीनने म्हटले की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि मैत्रीपूर्ण वक्तव्यानंतर अशी भाषा उभय सहकार्यात खोडा घालत आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले की, हे त्यांचे खासगी मत आहे की, भारत सरकारची याला सहमती आहे? अद्याप चीनला याची स्पष्ट कल्पना नाही. लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी डोकलाम वाद समाप्त झाल्यानंतर बुधवारी म्हटले की,  चीनसह पाकिस्तानशीही मुकाबला करण्यास भारत सज्ज आहे. उत्तरेकडे चीन आणि पश्चिमेकडे पाकिस्तानशी युद्धाची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. उत्तरेची स्थिती पाहून पश्चिमेकडे पाकिस्तानही याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो.  उत्तरेकडील स्थितीविषयी रावत म्हणाले होते की, चीनने शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. ‘सलामी स्लायसिंग’ म्हणजे हळूहळू भूभागावर कब्जा करणे. समोरच्या देशाची सहनशक्ती पारखणे, हा चिंतेचा विषय आहे. आपल्याला अशा हळूहळू येणाऱ्या संकटासाठी सज्ज राहावे लागेल. लष्करप्रमुखांनी चीनविषयी ही भूमिका मांडली होती.
 
दहशतवादी हल्ल्यात एक ठार 
दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री येथील वर्दळीच्या जहांगीर चौक परिसरात ग्रेनेडहल्ला केला. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. तीन पोलिसांसह १६ जण जखमी झाले. हल्ला चौकात तैनात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला. ग्रेनेड फेकणारा दहशतवादी यात जखमी झाला आहे.  

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात दोन पोर्टर जखमी  
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात सैन्यातील दोन पोर्टर जखमी झाले. संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने विनाकारण अचानक छोट्या व स्वयंचलित हत्यारांनी गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले.
बातम्या आणखी आहेत...