आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई - भारत आणि रशियाचा महत्त्वाकांक्षी संयुक्त उपक्रम असलेल्या तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा पहिला संच मंगळवारी दक्षिण पॉवर ग्रीडला जोडून विद्युतपुरवठा सुरू करण्यात आला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे रशिया दौर्यावर असताना अणुऊर्जा प्रकल्पाचे हे संक्रमण महत्त्वाचे मानले जात आहे.
मंगळवारी पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील पहिला संच दक्षिण पॉवर ग्रीडला जोडण्यात आला. सध्या या संचातून 75 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येत आहे. 13 जुलै रोजीच पहिल्या संचातून वीजनिर्मितीची निर्णायक प्रक्रिया सुरू झाली होती.
अणुऊर्जा नियमन मंडळाने ऑगस्टमध्येच या प्रकल्पाची वीज निर्मिती 50 टक्क्यांनी वाढवून 500 मेगावॅटपर्यंत करण्याची परवानगी दिली आहे.
चेन्नईपासून 650 किलोमीटर अंतरावर भारतीय अणुऊर्जा महामंडळ तिरुनेवेली जिल्ह्यातील कुडनकुलम येथे रशियाच्या संयुक्त सहकार्याने 1000 मेगावॅट क्षमतेच्या दोन प्रकल्पांची उभारणी करत आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावरून या प्रकल्पाला प्रचंड विरोध झाल्यामुळे प्रकल्प कार्यान्वित होण्यास आधीच खूप विलंब झालेला आहे.
पहिल्या संचाने 160 मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता गाठली आहे. टप्प्याटप्प्याने ती 500 मेगावॅट, 750 मेगावॅट आणि 1000 मेगावॅट, अशी वाढवण्यात येणार आहे. वीजनिर्मिती क्षमता वाढवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक चाचण्या आणि तांत्रिक मानकांची खातरजमा करावी लागते.
सर्व अडथळे दूर करणार
कुडनकुलम प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रलंबित मुद्दे निकाली काढण्यात येतील, असा मनोदय पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बोलून दाखवला आहे. उभय देशांतील सामरिक क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याचा निर्णयही या दोन नेत्यांनी घेतला आहे. पंतप्रधान सिंग यांनी पुतीन यांची क्रेमलिन पॅलेसमध्ये भेट घेतली. नियोजित वेळेपेक्षा उभयतांमध्ये 90 मिनिटे जास्त वेळ चर्चा चालली. भारत-रशियादरम्यानची ही 14 वी, तर पंतप्रधान सिंग यांची 5 वी वार्षिक बैठक आहे. दायित्वाच्या तरतुदींवरून कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील दोन प्रकल्पांचा करार कायदेशीर कात्रीत अडकला आहे. नव्या भारतीय कायद्यातील उत्तरदायित्वाच्या तरतुदींना रशियाचा विरोध आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.