( छायाचित्र- भारतीय मंगळयानाने गुरुवारी पाठवलेले हे पहिले छायाचित्र.)
बंगळुरू - बुधवारी मंगळाच्या कक्षेत स्थापित करण्यात आलेल्या भारतीय मंगळयानाने गुरुवारी या लाल ग्रहाचे पहिले छायाचित्र पृथ्वीवर पाठवले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो)
ट्विटरवर हे छायाचित्र व त्याची माहिती पोस्ट केली आहे.
पहिल्याच प्रयत्नांत मंगळापर्यंत धडक मारण्याचा इतिहास घडवणाऱ्या भारतीय यानाने ७३०० किमी उंचीवरून हे छायाचित्र टिपले आहे. मंगळयान सध्या या ग्रहाच्या लंबवर्तुळाकार त्रिज्येत परिभ्रमण करत असून या कक्षेत यानाचे मंगळापासून जास्तीत जास्त अंतर ७६,९९३.६ किमी तर किमान अंतर ४२१.७ किमी असेल. या कक्षेत मंगळाची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी यानाला ७२ तास ५१ मिनिट ५१ सेकंद एवढा कालावधी लागेल. येत्या काही आठवड्यांत यानावर लावण्यात आलेल्या पाच उपकरणाच्या माध्यमातून मंगळाच्या वातावरणात विविध चाचण्या घेतल्या जातील. विशेषत: मंगळाचा पृष्ठभाग, तेथील खनिज तसेच वातावरणातील मिथेन वायूचे प्रमाण या उपकरणांमार्फत तपासले जाईल.
सहा महिने परिभ्रमण : भारतीय मंगळयान किमान सहा महिने मंगळाच्या कक्षेत परिभ्रमण करेल. या काळात यानावरील उपकरणे माहिती पाठवत राहतील.
पहिले छायाचित्र पंतप्रधानांना भेट
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मंगळयानाने पाठवलेले पहिले छायाचित्र पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना भेट दिले. इस्रोचे चेअरमन के. राधाकृष्णन आणि सचिव व्ही. कोटेश्वरराव यांनी हे छायाचित्र पंतप्रधानांकडे सुपूर्द केले.
चीनला ईर्षा नाही
भारतीय मंगळयान पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल झाले याबद्दल चीनला ईर्षा नाही. उलट यामुळे अनेक अर्थांनी चीनला आनंद झाला असल्याचे राष्ट्रीय माध्यमांनी म्हटले आहे. भारताने जे करून दाखवले त्या क्षेत्रात चिनी लोकांना अतिशय घमेंड होती, या घमेंडीची जाणीव भारताच्या यशातून झाली आहे, असे "ग्लोबल टाइम्स'ने म्हटले आहे. चीनचे पहिले मंगळयान "यिंगुहो-१' २०११ मध्ये अवकाशात झेपावले खरे, मात्र नंतर त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. म्हणून या क्षेत्रात चीनला मागे टाकल्याचा आनंद भारतीयांना आहे, असे टाइम्सच्या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आले आहे. यासंबंधीचे वृत्त धडकताच आशिया खंडाच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हटले होते.
केरळमध्ये मंगळयान फेलोशिप जाहीर
भारताने अवकाश क्षेत्रात मिळवलेल्या यशानिमित्त केरळमधील विज्ञान-तंत्रज्ञान व पर्यावरण परिषदेने कृषी, शिक्षण, कौशल्य विकास व आरोग्य क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी फेलोशिप जाहीर केली आहे. यात निवडक उमेदवारांना दोन वर्षांसाठी ३० हजार रुपये अनुदान दिले जाईल.
नेतृत्वाचे यश
मंगळयान मोहिमेच्या या यशाचे खरे श्रेय या मोहिमेचे नेतृत्व करणारे इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन व सांघिक कार्याला द्यावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दिलेले प्रोत्साहनही तेवढेच महत्त्वाचे ठरले.
- के. कस्तुरीरंगन, इस्रोचे माजी अध्यक्ष