बंगळुरू - नऊ महिन्याच्या प्रदीर्घ प्रवासांत कठीण वाटणारे सर्व टप्पे सहज पार करून मंगळाच्या गुरुत्व बल परीघात दाखल झालेले भारतीय मंगळयान बुधवारी या लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांसाठी ही कसोटी आहे. सकाळी ७ : १७ : ३२ वाजता यानावरील इंजिन सुरू करण्यासाठी नियंत्रण कक्षातून कळ दाबली जाईल आणि भारत मंगळयानावर स्वार होत नवा इतिहास घडवेल.
इस्रोच्या शास्त्रज्ञांना प्रारंभीपासूनच प्रचंड विश्वास होता. त्यानुसार शेवटच्या टप्प्यापर्यंत ही मोहीम आली आहे. आता मोजकी आव्हानेच शिल्लक आहेत. त्यासाठी यानावर सर्व कमांड पूर्वीच फीड करून ठेवण्यात आल्या असल्या तरी कोणताही धोका पत्करण्यापेक्षा पर्यायी व्यवस्था अर्थात "प्लॅन बी' शास्त्रज्ञांकडे तयार आहे.
... तर तीन तासांत पहिले छायाचित्रही मिळणार
अंतिम आव्हान
* गुरुत्व बलाच्या परिघातून मंगळाच्या कक्षेत दाखल होताना यानाचा वेग २२.१ किमी प्रतिसेकंदावरून ४.४ किमी करावा लागेल.
* यासाठी सकाळी सव्वासातला यानावरील आठ द्रवरूप इंधन असलेली इंजिने २४ मिनिटांसाठी सुरू करावी लागतील.
* गेल्या १ डिसेंबरपासून निद्रिस्त असलेल्या या इंजिनाची चाचणी दोन दिवसांपूर्वी यशस्वी झाल्याने शास्त्रज्ञ निर्धास्त आहेत.
* सारे सुरळीत घडत गेले तर तीन तासांत उपग्रह पहिले छायाचित्रही पाठवेल.
पंतप्रधान मोदी नियंत्रण कक्षात
पंतप्रधान
नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह बुधवारी सकाळी इस्रोच्या नियंत्रण कक्षात उपस्थित राहतील.
नासाच्याही शुभेच्छा : नासाच्या शास्त्रज्ञांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. ही मोहीम मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरेल असे स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
नासाचे मावेन कक्षेत
अमेरिकेतील "नासा'ने गेल्या नोव्हेंबरमध्येच प्रक्षेपित केलेले मावेन हे अवकाश यान मंगळवारी मंगळ ग्रहाच्या वातावरणात पोहोचले आहे. यावर अभ्यासासाठी विविध उपकरणे लावण्यात आली आहेत.
ती बारा मिनिटे...
सकाळी ७ :१७:३२ वाजता भारतीय नियंत्रण कक्षातून कमांड दिली गेल्यानंतर यानाची इंजिने सुरू होतील. मात्र सुमारे ६८ कोटी किमी अंतरावर नेमके काय घडले आहे हे कळण्यासाठी शास्त्रज्ञांना १२ मिनिटे वाट पहावी लागेल. नंतर यानाची पुढील वाटचाल ठरेल. हा कालावधी शास्त्रज्ञांसह समस्त भारतीयांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा ठरेल.
असा इतिहास घडेल...
* पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम फत्ते करणारा भारत जगातील पहिला देश ठरेल.
* अवघ्या ४५० कोटी खर्चामध्ये ही मोहीम पूर्ण करणाराही भारत ठरेल पहिला देश.
* मंगळाच्या कक्षेत उपग्रह स्थापित करणारी इस्रो ठरेल जगातील चौथी अवकाश संस्था.
* भारतासाठी नव्या अवकाश मोहिमांची कवाडे खुली होतील.