विशाखापट्टनम - नौदलाच्या जहाजाला आणखी एक अपघात झाला आहे. विशाखापट्टनम बंदराजवळ गुरुवारी रात्री एक जहाज आत पाणी शिरल्याने बुडाले. त्यात नौदलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला असून 23 जणांना वाचवण्यात यश आले आङे. आणखी चार जवान बेपत्ता असल्याची माहितीही मिळत आहे.
गुरुवारी रात्री आठ वाजता विशाखापट्टनम बंदरापासून 15 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. या जहाजाचे नाव अस्त्रवाहिनी ए-72 आहे. हे जहाज टॉरपीडो रिकव्हरी व्हेसल म्हणून ओळखळे जाते. मोठ्या जहाजांद्वारे सरावासाठी चालवल्या जाणा-या लहान डमी मिसाईलच्या रिक्हरीचे काम त्याद्वारे केले जाते. या जहाजावर नौदलाचे 28 जवान होते. नौदलाने या बाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘जहाजाचा नियमित सराव सुरू असताना एका भागात पूर्णपणे पाणी शिरल्यामुळे जहाज पूर्णपणे बुडाले.
यापूर्वीही झाले अपघात
> 31 ऑक्टोबरला विशाखापट्टनमपासून 300 समुद्र मैल अंतरावर नौदलाच्या आयएनएस कोराची एका मालवाहू जहाजाबरोबर धडक झाली होती. सुदैवाने हा अपघात फार मोठा नव्हता, नसता जहाजावर असणा-या 16 क्षेपणास्रांना धोका निर्माण झाला असता.
> नौसेनेची जहाजे आणि पाणबुड्यांना गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक अपघातांना सामोरे जावे लागले आहे. त्याची सुरुवात ऑगस्ट 2013 मध्ये झाली होती. त्यावेळी आयएनएस सिंधुरक्षकवर झालेल्या स्फोटात 18 जवानांचा मृत्यू झाला होता.
> त्यानंतर 10 वा अपघात 26 फेब्रुवारीला आयएनएस सिंधुरत्नवर झाला होता. आग लागल्याने नौदलांच्या दोन जवानांचा मृत्यू झाला होता.