आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Police Kill 20 Suspected Red Sandalwood Smugglers

देशातील सर्वात भयंकर चकमक, टास्क फोर्स झाला अंडरग्राउंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुपती - आंध्र प्रदेशातील शेशाचलम जंगलात झालेल्या पोलिस चकमकीत २० जण मारले गेले. ठार झालेले चंदन तस्कर होते, असा दावा पोलिसांनी केला. घटनास्थळी पोहोचल्यावर आव्हान दिले असता त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात २० जण ठार झाले. चंदन तस्कर वीरप्पनच्या एन्काउंटरनंतर झालेले हे देशातील सर्वात मोठे एन्काउंटर आहे. या एन्काउंटरची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दैनिक भास्करने तपास केला असता पोलिसांचे दावे आणि वस्तुस्थितीत कित्येक विरोधाभास समोर आले.

चंदन तस्कर जंगलामध्ये कटाई करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती, असा दावा पोलिस आणि टास्क फोर्सने केला आहे. टास्क फोर्सने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर दगडफेक तसेच कुऱ्हाडीने हल्ला चढवला. टास्क फोर्सने आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. गोळीबार केला असता, कित्येक जण पळून गेले. नंतर टास्क फोर्सला येथे २० मृतदेह आढळले. त्यांचा मृत्यू गोळी लागून झाला होता. पोलिस आणि टास्क फोर्सला घटनास्थळी कुऱ्हाडी व धारदार शस्त्रेही आढळली. या प्रकरणी टास्क फोर्स कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.

आंध्र प्रदेश पोलिस आणि शेशाचलम येथील जंगलांमध्ये नजर ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे अधिकारी मीडियासमोर काहीही बोलण्यास राजी नाही. भास्करने घटना घडली त्या चंदनगिरी पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांशी सर्वप्रथम बोलण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपनिरीक्षक कुरनाकर यांना घटनास्थळावरून जप्त केलेले शस्त्र कुठे आहेत, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी लिखित स्वरूपात माहिती मागावी, असे सांगितले. लेखी दिले असता वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करा असे सांगत एसएचओ लेलाकृष्ण यांचा फोन नंबर दिला. एसएचओने फोन कट केला. नंतर सांगितले की, डीएसपी श्रीनिवास प्रसाद यांच्याशी कार्यालयात चर्चा करू शकता. त्यांची भेट घेण्यास गेलो असता, बाहेरच रोखण्यात आले. बरेच प्रयत्न केल्यानंतर टास्क फोर्सचे डीआयजी कांता राऊ चर्चा करण्यास राजी झाले. आम्हाला २०१३ मधील घटनेची पुनरावृत्ती करण्याची इच्छा नाही, असे त्यांनी सांगितले. त्या वेळी रक्तचंदन तस्करांनी आमच्या दोन कर्मचार्‍यांची हत्या केली होती. जंगलामध्ये तस्कर शिरल्याची माहिती आम्हाला ४ एप्रिल रोजी वनरक्षकाने दिली होती, असे त्यांनी अलीकडे घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले. आम्ही रात्रीच जंगलात गेलो.

आमच्याकडे २०-२० जणांच्या १० टीम होत्या. सुरुवातीला कटाई सुरू असलेल्या ठिकाणी आम्ही दोन टीम पाठवल्या. तस्करांजवळ पोहोचताच त्यांनी टास्क फोर्सच्या जवानांवर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी टास्क फोर्सला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. या वेळी कित्येकांनी घटनास्थळावरून पळ काढला. दिवस उजाडल्यावर हेलिकॉप्टरने शोध मोहीम राबवून ६६ जणांना अटक केली. ४५० जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. टास्क फोर्सने केलेला हल्ला जबरदस्त होता, असे या चकमकीत सहभागी एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आम्ही जीव वाचवण्यासाठी गोळीबार केला, असेही त्याने सांगितले. मात्र, टास्क फोर्समध्ये किती जणांचा समावेश होता, याची माहिती एकही अधिकारी देऊ शकला नाही. उर्वरित प्रश्नांची उत्तरे न देताच ते निघून गेले.