आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Hands Over Kirpal Singh\'s Body To India

पाकिस्‍तानची कुरापत : हृदय, यकृत काढून दिला किरपालसिंहचा मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरपालसिंहचे शोकमग्‍न नातेवाईक. - Divya Marathi
किरपालसिंहचे शोकमग्‍न नातेवाईक.
अमृतसर - पाकिस्तानच्या कोट लखपत राय तुरुंगात २१ वर्षांपासून भारतात परतण्याची वाट पाहत असलेल्या किरपालसिंह परदेसी याने ११ एप्रिलला अंतिम श्वास घेतला होता. त्याचा मृतदेह मंगळवारी भारतात आणण्यात आला. त्याच्या नातेवाइकांनी झीरो लाइनवर मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर अमृतसर वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. पाकिस्तानी डॉक्टरांनी त्याचे हृदय आणि यकृत काढून घेतल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले. किरपालसिंह हा २०१३ मध्ये मारल्या गेलेल्या सरबजितसिंगचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता.
उपविभागीय अधिकारी राजेश शर्मा यांनी सांगितले की, लाहोरच्या जिना रुग्णालयातही शवविच्छेदन करण्यात आले आहे. किरपालचा मृत्यू हृदयविकाराने झाला, असे पाकिस्तानने सांगितले आहे. त्यासाठी हृदय आणि यकृत काढणे ही सामान्य बाब आहे. डॉक्टरांनी सांगितले की, मृतदेहाच्या आत आणि बाहेर जखमांच्या कुठल्याही खुणा नाहीत. आतील अवयवांचा व्हिसेरा काढून प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. त्याला विष देऊन तर मारण्यात आले नाही ना, हे त्यावरून स्पष्ट होईल. किरपालच्या मृतदेहासोबत भारतात आलेल्या सामानात त्याचे एक पत्रही आहे. ते त्याने मृत्यूपूर्वी लिहिले होते, पण तो ते पोस्ट करू शकला नव्हता. त्यात त्याने म्हटले आहे की, मला फसवण्यात आले आहे. मी निर्दोष आहे. मला भेटण्यासाठी कोणी तरी या, चांगला वकील लावा आणि मला येथून सोडवा. मला येथून निघायचे आहे. मी तुम्हाला अनेक पत्रं पाठवली आहेत, पण उत्तर मिळाले नाही. मी खूप कठीण स्थितीत तुरुंगात जगत आहे.