म्हैसूर - देशात वाघांची संख्या वाढत असल्याचे ताज्या व्याघ्रगणनेत आढळून आले आहे. पश्चिम घाट क्षेत्रात वाघांची संख्या 410 ते 450 च्या घरात पोहोचली आहे, अशी माहिती राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने दिली आहे. वाघांच्या वाढत्या संख्येत मध्य प्रदेशला मागे टाकून कर्नाटकने आघाडी घेतली असून सर्वाधिक वाघसंख्या असलेले देशातील राज्य म्हणून त्याची नोंद झाली आहे.
देशातील वाघांच्या संख्येचे अचूक आकलन करण्यासाठी 18 ते 24 डिसेंबर या कालावधीत देशव्यापी व्याघ्रगणना करण्यात येत आहे. वन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले की, कर्नाटकातील बांदीपूर, चनागरहोल, बिलिगिरीरंगा या तीन अभयारण्यांत वाघांची संख्या 160 वरून 200 पर्यंत पोहोचली आहे. बांदीपूर अभयारण्याचे संचालक एच. सी. कंथराज यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघांच्या संख्येत आशादायक वाढ झाली आहे. या अभयारण्यात वाघांच्या वाढलेल्या घनतेनुसार प्रमाण लक्षात घेतले तर दर आठ चौरस किलोमीटर क्षेत्रात एक याप्रमाणे वाघ आढळतो.
यामुळे वाढली वाघांची संख्या
या क्षेत्रात वाघांची संख्या वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वाघांच्या संरक्षणासाठी येथे तंत्रशुद्ध उपाय हाती घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाघांची शिकार व तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पश्चिम घाट क्षेत्राचा विस्तार महाराष्टÑापासून तामिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत आहे. कर्नाटकातील बांदीपूर अभयारण्याशिवाय तामिळनाडूतील मदुमलाई व केरळमधील वायनाड व्याघ्र प्रकल्पांचाही यात समावेश आहे. देशभरातील वाघांच्या संख्येचे अचूक निदान काढण्यासाठी एनटीसीएने जारी केलेल्या यादीशिवाय केवळ अभयारण्यातच नव्हे तर राज्यांतील इतर संभाव्य भागातही वाघांची गणना करण्यात येत आहे. यात कोडागुच्या ब्रह्मगिरी व पुष्पगिरी क्षेत्रातही ही गणना करण्यात आली आहे.
कर्नाटकात 520वाघ
देशात आतापर्यंत मध्य प्रदेश हे 400 वाघांसह पहिल्या स्थानी होते. परंतु ताज्या आकडेवारीनुसार कर्नाटकात 520 वाघांसह पहिल्या स्थानी आहे. सध्या देशात एकूण 42 अभयारण्ये आहेत. 2010 मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेत या क्षेत्रात केवळ 1706 वाघ आढळले होते. देशातील वाघांची ही संख्या जगातील एकूण वाघसंख्येच्या जवळपास निम्मी आहे.